March 30, 2026
दिल्लीतील ध्वजवंदनास उपस्थित राहण्याचा कोरेगाव भिमाच्या सरपंचांना मिळाला मान 

दिल्लीतील ध्वजवंदनास उपस्थित राहण्याचा कोरेगाव भिमाच्या सरपंचांना मिळाला मान 

लाल किल्ल्यावरील ध्वजा वंदनास कोरेगाव भीमाचे सरपंच संदिप ढेरंगे यांना सपत्नीक विशेष निमंत्रण 

 सुनील भंडारे पाटील

दिल्लीतील लाल किल्ल्यावरील ध्वज वंदनास उपस्थित राहणे हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब असते. भारताचा पहिला ध्वज ज्या ठिकाणी फडकला त्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर ७९ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात उपस्थित राहण्याचा बहुमान कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना मिळाला असल्याने कोरेगाव भीमाच्या नाव लौकिकात भर पडणार आहे.

महाराष्ट्रातून निवड झालेल्या अवघ्या १७ सरपंचांमध्ये आणि पुणे जिल्ह्यातून एकमेव सरपंच म्हणून संदीप ढेरंगे सपत्नीक त्यांची निवड होणे, हे त्यांच्या असामान्य कार्याची पोचपावती आहे. प्रशासनाच्या वतीने पहिल्यांदाच या ध्वजवंदनास सरपंच जात असल्याने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्याचाही गौरव आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावर प्रथम ध्वज फडकवीत असताना भारतीय स्वातंत्र्याचा हा आनंदोस्तव प्रत्येक भारतीय आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवत असतात. मात्र लाल किल्ल्यावर होणारे हे ध्वजवंदन व त्यानंतर भारताच्या संरक्षण विभागाच्या तिन्ही दलाकडून देण्यात येणारी संचालनाच्या माध्यमातून मानवंदना आपण स्वतः उपस्थित राहून पाहणे हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असते.

अशेच स्वप्न कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांचेही लहानपणापासून होते. कोरेगाव भिमाचे दुसऱ्यांदा सरपंच पद भूषवीत असताना त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले अथक परिश्रम व “स्मार्ट कोरेगाव भिमा” ही संकल्पना सत्यात उतराविण्यासाठी वेळ प्रसंगी शासनाकडेही निधीसाठी व वन जमीन गावच्या शुद्ध पाणी प्रकल्पासाठी मिळवलेली जागा या त्यांच्या कार्याची दखल थेट दिल्लीमध्ये घेतली गेली. एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाने उद्योजक बनून घेतलेली ही भरारी आणि आता देशाच्या सर्वोच्च पातळीवर मिळालेला हा सन्मान, हे खऱ्या अर्थाने नेत्रदीपक यशाची निशाणी आहे.

संदीप ढेरंगे यांना मिळालेला हा बहुमान हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून, निस्वार्थ भावनेने समाजाची सेवा करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल संपूर्ण पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ढेरंगे यांच्या निवडीमुळे कोरेगाव भीमा या गावाची ओळख आता देशपातळीवर पोहोचली आहे.

त्यांच्या या सन्मानाबद्दल कोरेगाव भीमा गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहेत. “या सन्मानामुळे आमच्या गावाचे नाव देशभरात आदराने घेतले जाईल,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. संदीप ढेरंगे यांची पत्नी माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली संदीप ढेरंगे यांनाही या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण ग्रामविकास विभागामार्फत देण्यात आले असल्याने पतीच्या यश्यात पत्नीचाही मोठा सहभाग असतो याचा हा गौरव ठरणार आहे.

सरपंच काळात एकदाही ध्वजवानंदन न करणारा अवलिया 

कोरेगाव भिमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी दोन वेळा सरपंचपद भूषवूनही एकदाही स्वतःच्या हाताने ध्वजारोहण केले नाही. उलटपक्षी, त्यांनी हा मान गावातील विविध घटकांना दिला. यामध्ये महाराष्ट्र महिला क्रिकेटची संघाची कर्णधार , दिव्यांग व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिकांचे वारस, कचरा सफाई करणाऱ्या महिला, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांचा समावेश आहे. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना मान देऊन, त्यांनी नेतृत्वाची एक नवी ओळख समाजासमोर ठेवत सरपंच काळात एकदाही ध्वजवानंदन न करणारा अवलिया संदीप ढेरंगे ठरले आहे.