रांजणगाव ता.शिरूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये भंगार उचलण्याच्या ठेकेदारीवरुन पुन्हा एकदा वाद वाढले असुन पोलीस स्टेशन पासुन पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या यश इन चौकात एका नामांकित कंपनीचे भंगार उचलण्याच्या कारणावरुन वादावादी झाली व वादावादीचे रुपांतर भेट जीवे मारण्याची धमकी देण्या पर्यंत पोहोचले.
याबाबत महंम्मद रियाज उद्दीन फकर उद्दीन (वय ५०) यांनी रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यातील एका आरोपीस अटक करण्यात आले आहे.
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचं रांजणगाव औदयोगिक वसाहतीतील व्हर्लपूल कंपनीत भंगार स्क्रॅपचे टेंडर असुन त्याची मुदत (दि ३०) रोजी संपत असल्याने बुधवार (दि २२) रोजी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि भाऊ असे तिघेजण हे स्क्रॅपचे नवीन ऑनलाईन टेंडर भरण्यासाठी आले होते. त्यावेळी यश इन चौकातील गंगा ग्रँड हॉटेल मध्ये कॉफी पिऊन हे तिघेजण हॉटेलच्या समोर उभे असताना एम एच ०२ एफ एम २२४२ या चारचाकी गाडीतुन मुस्ताक शफी अहमद आणि सिद्धिक शफी अहमद हे दोघे उतरुन महंम्मद रियाज उद्दीन यांच्या जवळ आले त्यापैकी मुस्ताक अहंमद याने फिर्यादीस “तुम कंपनीमें स्क्रॅप का टेंडर नहीं भरणे का, एक बार तुझे बोल दिया, तुझे समज में नहीं आया क्या…? तेरी लाश पता भी लगने नही दूंगा” असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. .
त्यावेळी दुसऱ्या चारचाकी गाडी क्रं एम एच १२ टि ६०७८ या गाडीतुन अकील अहंमद, अमीर शेख, काशेफ तसेच पंडित देवकर हे खाली उतरले आणि फिर्यादीस “मुस्ताक की बात मान जा, नही तो जान से हाथ धो बैठेगा” असे म्हणत या सर्वानी फिर्यादीस मारहाण करत जबरदस्तीने गाडीत बसवत पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी, त्यांचा मुलगा आणि चुलत भाऊ यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने आजुबाजुला जमलेल्या लोकांनी फिर्यादीस त्या सहा जणांच्या तावडीतुन सोडविले. त्यानंतर हे सहा आरोपी दोन गाड्यांमध्ये बसुन पळुन गेले. त्यानंतर फिर्यादीने तात्काळ रांजणगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात धाव घेत सहा जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
रांजणगाव एम आय डी सी पोलिस ठाण्यात मुस्ताक शफी अहमद, सिद्धिक शफी अहमद, अकील अहंमद, अमीर शेख, काशेफ (सर्व मुळ रा. औरंगाबाद, सैदा कॉलनी, सेंटर जेल जवळ, ता. जि. औरंगाबाद ) सध्या रा. यश इन चौक, कारेगाव तसेच पंडित देवकर (रा.बाभुळसर खुर्द, ता. शिरुर, जि. पुणे) या सहा जणांवर अपहरण करण्याचा प्रयत्न करुन जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. रांजणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र वाघमोडे, सुरज वळेकर, पोलीस हवालदार विलास आंबेकर यांनी तात्काळ हालचाल करत एका आरोपीस अटक केली असुन पुढील तपास सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे करत आहेत.