तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर ) येथील ज्ञानदीप ग्रंथालय-वाचनालय आणि संस्कृती जागरण मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक वार्तापत्रच्या अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जोगेश्वर कस्तुरे बोलत होते. ‘फाळणीच्या वेदना एक विस्तृत नरसंहार’ या विषयावर बोलत असताना त्यांनी अनेक धोरणांचा मागोवा विद्यार्थी व पालक यांच्यासमोर मांडला. १५ ऑगस्ट १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्याचे रक्षण करायचे असेल तर इतिहासात १६ ऑगस्ट १९४६ आणि १४ ऑगस्ट १९४७ ला काय झाले हे भारतीयांनी विसरता कामा नये असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्ञानदीप ग्रंथालय व वाचनालय तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ होते. तळेगाव ढमढेरेच्या सरपंच यावेळी अंकिता भुजबळ, ज्ञानदीप ग्रंथालय वाचनालय चे सचिव अण्णासाहेब तोडकर, उपाध्यक्ष नारायण शेवकर संस्कृती जागरण मंडळ पुणेचे संपर्कप्रमुख निखिल वझे, केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, पंडित भुजबळ आदी मान्यवर तसेच समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व अनेक पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी केले. सुरेखा डोईफोडे यांनी सूत्रसंचालन केले तर शालन खेडकर यांनी आभार मानले.

