यापुढील काळात पुरंदरचा दिव्यांग अधिक सक्षम होण्यासाठी आणि आर्थिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी नियोजित दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून जेजुरी एमआयडीसी मध्ये जागा उपलब्ध करून देण्यात येईल. असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.सासवड ( ता. पुरंदर ) येथे नगरपरिषदेच्या वतीने शहरातील दिव्यांग बांधवाना पाच टक्के निधीतून १२६ दिव्यांगाना प्रत्येकी १३ हजार ८०० प्रमाणे १७ लाख ३८ हजार ८०० रुपयांच्या निधीचे वितरण आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर दिव्यांगाना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, गटनेत्या आनंदी काकी जगताप, उपनगराध्यक्षा सारिका हिवरकर, मुख्याधिकारी निखिल मोरे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, नगरसेवक मनोहर जगताप, नगरसेविका सीमाताई भोंगळे, सागर जगताप सुजित बडदे, आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, सुनील नाना जगताप, भूषण मचाले आदी उपस्थित होते. संभाजी महामुनी यांनी सूत्रसंचालन केले. तर महेश मांगडे यांनी आभार मानले.
आमदार जगताप यांच्या हस्ते १७ लाख ३८ हजार रुपये दिव्यांग निधीचे वितरण.
सासवड बाप्पू मुळीक
दिव्यांग व्यक्तींना त्यांचे पाच टक्के निधीचे वितरण दरवर्षी करून तसेच वेळोवेळी मागण्या मान्य करून न्याय देणारी संपूर्ण राज्यातून एकमेव सासवड नगरपरिषद आहे. दिव्यांगाना तीन चाकी गाड्या, कोरोना काळात किराणा कीट देतानाच वेळोवेळी शिबिरे घेवून एसटी पास, वैश्विक ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तपासणी, ई श्रम कार्ड देण्याचे उपक्रम राबविले आहेत.
निधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन प्रहार अपंग आंदोलन संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, प्रहारचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, संदीप जगताप, महिलाध्यक्षा रेखा धुमाळ, शहराध्यक्ष दत्तात्रय दगडे, आर्यन जगताप, शकील बागवान आदींनी केले होते.
दिव्यांग निधीचे वितरण करण्यासाठी काही व्यक्तींनी नुकतेच नगरपालिकेत आंदोलन केले होते. याबाबत बोलताना आमदार संजय जगताप यांनी सांगितले कि, सासवड हद्दीतील तसेच ग्रामीण मधील काही व्यक्तींचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींनी पुन्हा तपासणी करून ऑनलाईन प्रमाणपत्र सादर करावे. त्यानंतरच निधीचे वाटप करण्यात येईल. काही व्यक्तीं ग्रामीण भागात राहतात, सर्व व्यवसाय, रेशनकार्ड त्याच गावचे असताना केवळ नगरपालिके मधून जास्त पैसे मिळतात म्हणून इथे लाभ घेतात. त्यामुळे अशा व्यक्तींचा निधी बंद करून स्थानिक दिव्यांग बांधवाना देण्यात यावा अशी मागणी प्रहार अपंग संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केली आहे.

