रांजणगाव गणपती संभाजी गोरडे
ढोक सांगवी (तालुका शिरूर) येथे शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारी चोरणा-या एका चोराला शेतकऱ्यांनी पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले असता पोलीसांनी पोलीसी हिसका दाखवताच संबंधित चोराने दुसऱ्या चोराचे नाव सांगीतले व आणखी काही विद्युतपंप चोरी केल्याचे कबुल केल्याने गुन्हे दाखल केले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की , ढोकसांगवी येथील निमगाव भोगी रस्त्या लगतच्या डिंभा कालव्याच्या चारी जवळून २५ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन संशयित इसम फिरत असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले संबंधित शेतकऱ्यांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्या काही अंतरावरती पाण्याची मोटार पडलेली दिसली. त्या वेळी तेथे असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक जण पळून गेला एका चोरट्यास शेतकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.याबाबत श्री आनंदा भानुदास गोरडे राहणार ढोकसांगवी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर नंदू भोसले राहणार ढोक सांगवी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याचा साथीदार सिद्धांत विलास वायदंडे राहणार वडनेर बुद्रुक तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर त्याच्या सोबत मोटारीची चोरी करत असल्याचे सांगितले.
या दोन्ही आरोपींनी अशाच प्रकारच्या आणखी ही विहिरीतील मोटारी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे, त्यांच्याकडून दोन मोटारी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे , दत्ताञय शिंदे , विजय शिंदे , उमेश कुतवळ , विलास आंबेकर , संतोष औटी , अमित चव्हाण , राजेंद्र ढगे यांच्या पथकाने केली.

