March 30, 2026
मांडवगण फराटा : एकनाथ थोरात
         गुनाट( ता.शिरूर ) येथील श्री गुरु दत्ताचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र गुनाट येथे बुधवारी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.     

दत्तमंदिरात बुधवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . दिवसभर ‘ दिगंबरा दिगंबरा’च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता . गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी परिसरातून हजारो भाविक आले होते . मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली होती . तसेच विद्युतरोषणाईने अवघा परिसर लखलखून निघाला.  

 गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक विधी करण्यात आले. रात्री १२.३० ते पहाटे ३.३० पर्यंत महाअभिषेक व मूर्तीना रुद्राभिषेक करण्यात आला . त्यानंतर पहाटे ४ वाजता दत्त मूर्तीला फुलांनी सजावट करण्यात आली . पहाटे ५ वाजता धूप आरती झाल्यावर. सकाळी शंखनाद व ७ वाजता आरती घेण्यात आली . परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. त्यानंतर माधूकरी कार्यक्रम झाल्यावर होमहवन करण्यात आले, महाआरती व पसायदान घेण्यात आले ,शिष्यांच्या वतीने अमोल महाराज झिटे यांचे गुरुपूजन व दर्शन सोहळा पार पडला . यावेळी परिसरातील भाविक भक्तगण व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्व भाविकांनी दत्त देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अन्नदानाचा लाभ घेतला.