महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या दि. १३ जुलै २०२२ रोजीच्या अहवालानुसार राज्यातील पूर परिस्थितीमुळे दि.१ जून २०२२ ते दि.१२ जुलै २०२२ या कालावधीत ८९ व्यक्ती व १८१ प्राणी यांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेली २४९ गावे तर एकंदरीत १ हजार ३६८ घरांची पडझड झाली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यात एन.डी.आर.एफ.ची पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरलेले असल्याने त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे; अशा परिस्थितीत पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यास त्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर व जनजीवनावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ३२ हजार ७४३ (२५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून) पैकी निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या ७ हजार ६२० इतक्या सहकारी संस्था आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरू असणाऱ्या संस्था पैकी नामनिर्देशन सुरू असलेल्या सहकारी संस्था ५ हजार ६३६ इतक्या आहेत. नामनिर्देशन सुरू न झालेल्या सहकारी संस्था १ हजार ९८४ इतक्या आहेत. बहुतांश सहकारी संस्था या ग्रामीण भागात असून त्यांची सदस्य संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. तथापि राज्याची सध्याची पूरपरिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन व वाहतूक व्यवस्था आणि ही परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडणे शक्य होणार नाही. जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदवत यावा यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतुदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात २५० किंवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च अथवा उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत त्यांच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी असेही या शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


