लोणी काळभोर (तालुका हवेली) येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्कामाची परंपरा अबाधित राहिली आहे .या विषयावर ग्रामस्थ, पालखी सोहळा प्रमुख व हवेली प्रांताधिकारी यांच्यात झालेल्या शुक्रवार दि. ९ जुन रोजीच्या बैठकीत निर्णय झाला आहे,
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम यंदाच्या वर्षी लोणी काळभोर येथे न घेता कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पालखी स्थळ मैदान येथे घेण्याचा निर्णय पालखी सोहळा विश्वस्तांनी घेतला होता. त्यानुसार प्रशासनाच्या कामांना पालखी मैदान येथील कामांना वेग आला होता. विश्वस्तांनी घेतलेल्या मुक्कामाचा निर्णय रद्द करण्यासाठी लोणी काळभोर चे सरपंच योगेश काळभोर यांनी गावतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवार दिनांक ४ जुन रोजी ग्रामस्थांची बैठक आयोजित केली यामध्ये विश्वस्तांच्या निर्णयाला तीव्र विरोध करुन पालखीला असहकार व बहिष्काराचा निर्णय एकमताने झाला. अखेर यानंतर पुन्हा मंगळवार दि. ६ जुन रोजी ग्रामस्थ पालखी विश्वस्तांना भेटले त्यांनी पुर्नविचार करु असे सांगितले.अखेर शुक्रवार दि ९ जुन रोजी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत विश्वस्तांनी पालखीच्या लोणी काळभोर येथील मुक्कामास होकार दिला.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निर्णय संदर्भात हवेली प्रांताधिकारी कार्यालयात याविषयी बैठक संपन्न झाली.यावेळी प्रांतअधिकारी संजय आसवले, गट विकास अधिकारी भूषण जोशी, पालखी सोहळा समितीचे संजय मोरे, अजित मोरे, भानुदास मोरे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर, कदमवाकवस्तीचे सरपंच चित्तरंजन गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, माजी उपसभापती सनी काळभोर, संतोष भोसले, सुभाष काळभोर, राजकुमार काळभोर, माऊली काळभोर आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची पालखीच्या मुक्कामाचा निर्णय कायम राहिल्याने या निर्णयाचा ग्रामस्थांनी मोठ्या आनंदाने फटाके फोडुन स्वागत केले.