March 30, 2026
माहिती सेवा समितीचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांना मातृशोक

दुःखद…! माहिती सेवा समितीचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वारघडे यांना मातृशोक

सुनील भंडारे पाटील

बकोरी (तालुका हवेली) येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि दत्त कृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती कमल गोविंद वारघडे (वय ८१) यांचे रविवारी २२ मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, त्यांच्या निधनामुळे वारघडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून बकोरी व परिसरात शोककळा पसरली आहे.

कै. कमल वारघडे या काही दिवसांपासून आजारी होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आयुष्यभर कष्ट करत आपला संसार उभा केला. रोजगार हमी योजनेवर मजुरी करून त्यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना चांगले शिक्षण दिले. संघर्षमय जीवन जगत त्यांनी कुटुंबाला सक्षमपणे उभे करण्याचे मोठे कार्य केले.

पुणे शहरात जन्मलेल्या या कष्टाळू मातेनं बकोरीसारख्या ग्रामीण भागात येऊन कोणत्याही प्रकारची शेती, आर्थिक पाठबळ किंवा साधनसामग्री नसतानाही स्वतःच्या जिद्दीने, चिकाटीने आणि प्रामाणिक परिश्रमाने आपला संसार यशस्वीपणे उभारला. साधेपणा, कष्टाळूपणा आणि समाजाभिमुख वृत्ती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ठळक गुण होते.

त्या दत्त कृपा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना व सर्वसामान्य नागरिकांना संघटित करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली.

त्या माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या मातोश्री होत. चंद्रकांत वारघडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून त्यांच्या या कार्यामागे आईचे संस्कार, प्रेरणा आणि मार्गदर्शन हेच मुख्य बळ होते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

कै. कमल वारघडे यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे व सुना असा परिवार आहे. त्यांच्या पश्चात कष्ट, जिद्द आणि समाजसेवेची समृद्ध परंपरा राहिली आहे.

त्यांच्या निधनाने बकोरी परिसराने एक कष्टाळू, जिद्दी, दूरदृष्टी असलेले व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या कार्याची व आठवणींची छाप कायम समाजाच्या मनात राहील.

मुलाच्या वाढदिवशी आईचे निधन एका डोळ्यात हसू तर दुसऱ्या डोळ्यात आसू

माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांचा २२ मार्च हा वाढदिवस होता,आतापर्यंत बकोरी देवराई वनराई प्रकल्पामध्ये त्यांच्या माध्यमातून दोन लक्ष वृक्ष लागवड पूर्ण झाली असून या त्यांच्या सर्व जडणघडणीमध्ये त्यांच्या मातोश्री कमल वारघडे यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते, ह्या दिवशी अनेक सामाजिक उपक्रम राबवत चंद्रकांत वारघडे यांनी आतापर्यंत राज्यांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे , एका बाजूला वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत असताना दुसऱ्या बाजूला आईचे निधन होऊन त्याची भावपूर्ण श्रद्धांजली स्वीकारावी लागेल असा दुर्दैवी दुर्मिळ योगायोग चंद्रकांत वारघडे यांच्या आयुष्यात आल्याने संपूर्ण राज्यांमधून त्या दुर्मिळ घटनेची चर्चा होऊन हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.