March 30, 2026
शिक्रापूर : प्रा.एन.बी. मुल्ला
              सणसवाडी येथील श्रीनाथ प्लास्टिक या कंपनीला रविवार (दि. १० जुलै) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागल्याची घटना घडली असून तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाच्या तीन पथकांच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंपनीचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  वर्तवला जात आहे.
             

सणसवाडी (ता. शिरुर)  येथील एल अँड टी फाटा परिसरातील श्रीनाथ प्लास्टिक कंपनीमधील कामगार कंपनीत काम करत असताना वेल्डिंगचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अचानकपणे आग लागली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी सर्व कामगारामध्ये हाहाकार मजला व  आरडाओरडा करत कामगार कंपनीच्या बाहेर पळाले. काही वेळातच आगीचा भडका उडाला अन आगीचा धूर दोन किलोमीटर अंतरावरून दिसू लागला.   

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार शंकर साळुंके, संदीप कारंडे, पोलीस शिपाई अमोल रासकर, शिक्रापूरचे सरपंच रमेश गडदे, सणसवाडीचे उपसरपंच सागर दरेकर, पोलीस मित्र पप्पू सासवडे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. दरम्यान कंपनीमधील सिलेंडर तसेच शेजारी असलेल्या विद्युत रोहीत्राचे स्फोट झाले. काही वेळात रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दलाचे अधिकारी प्रदीप पावणे, भाऊसाहेब बागुल, बाळू पवार, सचिन मिसाळ, शुभम यादव तसेच पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे विजय महाजन, संदीप शेळके, नितीन माने, मयूर गोसावी, चेतन खमसे, उमेश फाळके, विकास पालवे, अभिजित दराडे, संदीप तांबे, ओम पाटील, प्रशांत अडसूळ यांची दोन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. दरम्यान पोलीस मित्र पप्पू सासवडे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करुन दिले. तब्बल दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर सदर ठिकाणची आग आटोक्यात आली. मात्र आगीमध्ये कंपनीतील सर्व मशिनरी तसेच साहित्य जळून खाक झाल्याने तब्बल दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.