लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पोलीसांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे यांनी तपास पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. तपास पथकाने मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने मंगळवारी (दि. ९ ऑक्टोबर) पेरणे गावचे हद्दीत कदम वस्ती जवळील मोकळ्या जागेत सुरु असलेल्या हातभट्टीच्या धंदयावर छापा टाकला. त्यामध्ये ७० लिटर दारू जप्त करुन १००० लिटर रसायन, दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप इत्यादी साहित्य ताब्यात घेवून जागीच नष्ट करण्यात आले.
हातभट्टी चालकास ताब्यात घेवून महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला तर एकजण फरार झाला आहे. यापूर्वीही लोणीकंद पोलिसांनी मौजे भावडी, पिंपरी सांडस, पेरणे गावचे हद्दीत छापा टाकून हातभट्टी चालकांविरुध्द कारवाई केली होती. पुढील तपास पोना अजित फरांदे करीत आहेत.
