देशी गाईंच्या गोसंवर्धन बरोबर घरगुती उत्पादने … सद्गुरू कृपा गोशाळा
या गो शाळेस आवर्जून भेट द्या… आदर्श सरपंच दामुशेठ घोडे
शिरूर तालुका विशेष प्रतिनिधी
शिरूर येथील हरीदास कोंडीबा खिलारी यांनी गावरान गाईंचे गोसंवर्धन करून गायीच्या शेण व गोमुत्रपासून आणि औषधी वनस्पती वापरून मानवी व जनावरांच्या व्याधी वर इलाज होईल असे नैसर्गिक पणे उपाय करणारे गुणकारी उत्पादने बनवून गोसंवर्धन या बरोबरच उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे.
आयटीआय (यंत्र कारागीर) चे शिक्षण घेऊन पंचवीस वर्ष चाकण एमआयडीसी मध्ये एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मध्ये कायमस्वरूपी कामगार म्हणून काम करत असताना लहानपणापासून शेतीशी जोडलेली नाळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणून त्यांनी नोकरी सोडली आणि गावाकडे येऊन गावरान गाई पाळण्यास सुरुवात केली. ग्रामीण भागात शेतकरी शक्यतो गावरान गाय विकत देत नाही म्हणून त्यांनी लोकांकडून आंदन म्हणून गाय घेण्यास सुरुवात केली व एक एक करून आज त्यांच्याकडे २४ देशी (गावरान) गायी आहेत. गायीच्या शेण व गोमूत्रापासून नवनवीन उत्पादने बनविण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलांना चेन्नई येथे प्रशिक्षणासाठी पाठवले होते. प्राचीन काळी भारत देश हा धनधान्याने समृद्ध होता आणि या समृद्धी मागील कारण गोमाता होती म्हणूनच देशी गावरान गायींचे संगोपन करण्याचा निर्धार खिलारी यांनी केला असून ते पूर्णवेळ गायीचे संगोपन आणि उत्पादने बनविण्यात व्यस्त असतात.
१६ मार्च २०१७ रोजी खिलारी यांनी सद्गुरू कृपा गोशाळा या सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून गाय ही भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा घटक असून पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करणे गरजेचे असल्याने या संस्थेमार्फत पशुपालकांना मार्गदर्शन करून त्यांना महत्त्व पटवून दिले जात आहे. मानवाच्या निरोगी आरोग्यासाठी आणि विषमुक्त शेतीसाठी गाईच्या पंचगव्य ( शेण, गोमुत्र, दूध, ताक,दही) यापासून शेती व मानवास उपयुक्त अशी उत्पादने तयार करण्याचे काम ते करत आहेत.बनवत असलेले उत्पादने- नेत्र औषधी, पंचगव्य भस्म, दंतमंजन अमृत धारा धूप बत्ती, गोमूत्र अर्क, पंचगव्य गृत, फेस पॅक, साबण ,बावची मलम, स्प्रे, जखमांसाठी मलम , मुळव्याध पावडर, भीमसेनी कापूर, गोवरी ,अमोनिया असे विविध उत्पादने गाईच्या शेण व गोमूत्र पासून तयार करण्यात येत आहेत. गाईंसाठी २० गुंठे जागेत मुक्त गोठा बनविला असून चाऱ्यासाठी स्वतःच्या चार एकर शेतातील चारा व काहीवेळा बाहेरून विकत चारा घ्यावा लागतो तसेच या गाईंचे संगोपन करण्यासाठी पती, पत्नी व मुलगा तिघेजण पूर्णवेळ नियोजन करत असतात. कंपनी मध्ये पर्मनंट असताना काम करून जो पगार मिळत होता तेवढे उत्पन्न मला दरमहा गायींची सेवा करून मिळत असल्यामुळे मला माझ्या आवडीनुसार काम केल्याचे समाधान मिळत आहे असे खिलारी यांनी सांगितले.
बनविलेल्या उत्पादनापासून परिसरातील अनेक लोकांची वेगवेगळ्या व्याधींपासून मुक्तता झालेली आहे. या छोटेखानी गो शाळेस आयुर्वेदाचे अभ्यासक चंद्रकांत विचारे यांनीही भेट दिली आहे.


