तर काही घडलेल्या गंमतीशीर घटना मुळे वातावरण हलके फुलके होत होते व हास्याचे कारंजे उडत होते. शिक्षण घेत असताना वाळूच्या गाड्या खाली करण्यापासूनची अनेक कष्टाची कामे केल्याचे समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. तत्कालीन प्राचार्य कै.व.द.देसाई सर, कै.वळसंगकर सर व सर्व प्राध्यापक यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे आज आम्ही सुखाचे दिवस अनुभवत आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनोगता मधून व्यक्त होत होती. अनेकांची कॉलेज सोडल्यानंतर प्रथमच भेट होत होती त्यामुळे थट्टा मस्करी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली होती.
स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे माजी प्राचार्य मधुकर नवले सर ,प्रा. भालचंद्र मालू सर, प्रा .शोभना आळवणी मॅडम, प्रा. भालचंद्र कांबळे सर अध्यापक विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संतोष शिंदे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्वांना संबोधित केले. सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवन कसे जगावे आहार विहार कसा असावा याचे उद्बोधक असे मार्गदर्शन केले.
ज्या अध्यापक विद्यालयामुळे आपण शिक्षक म्हणून घडलो, त्या अध्यापक विद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून विद्यालयाची गरज लक्षात घेऊन विद्यालयाला पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य नवले सर आणि उपस्थित प्राध्यापकांच्या शुभहस्ते विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संतोष शिंदे सर यांच्याकडे सुपूर्त केली.
