March 30, 2026
तब्बल 40 वर्षांनी वाजली पुन्हा एकदा विद्यालयाची घंटा.सेवा निवृत्त झालेल्या व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या छात्र शिक्षकांची भरली शाळा

सुनील भंडारे पाटील 

        महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरणेश्वर पुणे या अध्यापक विद्यालयातून अध्यापक पदविका प्रशिक्षण घेतलेल्या 1982 ते 1984 या तीन वर्षातील माजी छात्र शिक्षकांचा स्नेह मेळावा अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातून विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यासारख्या शहरात येऊन शिक्षक होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी केलेले शारीरिक कष्ट , छात्र शिक्षक म्हणून सराव पाठ घेताना आलेले अनुभव घडलेल्या गंमती जंमती हे अनुभव कथन करत असताना अनेकांची मनं हळवी होत होती,

            तर काही घडलेल्या गंमतीशीर घटना मुळे वातावरण हलके फुलके होत होते व हास्याचे कारंजे उडत होते. शिक्षण घेत असताना वाळूच्या गाड्या खाली करण्यापासूनची अनेक कष्टाची कामे  केल्याचे समाधान अनेकांच्या चेहऱ्यावर दिसत होते. तत्कालीन प्राचार्य कै.व.द.देसाई सर, कै.वळसंगकर सर व सर्व प्राध्यापक यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे आज आम्ही सुखाचे दिवस अनुभवत आहोत ही  भावना  प्रत्येकाच्या मनोगता मधून व्यक्त होत होती. अनेकांची कॉलेज सोडल्यानंतर प्रथमच भेट होत होती त्यामुळे थट्टा मस्करी आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाली होती.

           स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे माजी प्राचार्य मधुकर नवले सर ,प्रा. भालचंद्र मालू सर, प्रा .शोभना आळवणी मॅडम, प्रा. भालचंद्र कांबळे सर अध्यापक विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संतोष शिंदे सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व सर्वांना संबोधित केले. सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवन कसे जगावे आहार विहार कसा असावा याचे उद्बोधक असे मार्गदर्शन केले. 

          ज्या अध्यापक  विद्यालयामुळे  आपण शिक्षक म्हणून घडलो, त्या अध्यापक विद्यालयाच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून विद्यालयाची गरज लक्षात घेऊन विद्यालयाला पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य नवले सर आणि उपस्थित प्राध्यापकांच्या शुभहस्ते विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य संतोष शिंदे सर यांच्याकडे सुपूर्त केली.

            स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यासाठी विष्णू संकपाळ, दशरथ कटके, नामदेव जगताप,हनुमंत कामथे ,मनोहर बाबर यांनी पुढाकार घेतला तर त्यांना सहकार्य विजय बेंडभर,अरविंद गोलांडे, अनिल गद्रे मोहन जाधव,प्रदीप कल्याणकर, तैमूर शेख,अर्पिता आजगावकर,  व ग्रुपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.सहभोजनाचा आस्वाद घेऊन जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला परत पुन्हा असेच भेटू हा शब्द देऊन.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णु संकपाळ यांनी केले. आभार हनुमंत कामथे यांनी मानले.