March 30, 2026
आता माघार नाही….! योगेश झुरुंगे

आता माघार नाही….! मी ही निवडणूक लढणार म्हणजे लढणारच आहे; योगेश झुरुंगे

सुनील भंडारे पाटील

ही निवडणूक लढणार म्हणजे लढणारच आहे! असा ठाम निर्धार व्यक्त करत लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणानंतर लोणीकंद–पेरणे गट मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी आरक्षित झाला असून झुरुंगे यांच्या उमेदवारीला गती मिळाली आहे.

गेल्या काही वर्षांत लोणीकंद परिसरात कार्यकर्ते म्हणून झुरुंगे यांनी घडवलेली जनसंपर्काची भक्कम पायाभरणी, सामाजिक कार्यात केलेला सक्रीय सहभाग आणि स्थानिक प्रश्नांवरील भूमिका यामुळे त्यांचे नाव या गटातील प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहे.

झुरुंगे यांनी आरक्षण जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच निवडणूक रणसज्जतेला वेग दिला आहे. त्यांनी लोणीकंद, फुलगाव, तुळापूर, वडगाव शिंदे, निरगुडी, भावडी, पेरणे, वढू खुर्द, बकोरी, डोंगरगाव, बुर्केगाव आणि पिंपरी सांडस या बारा गावांतील मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

गावागावांत फिरून लोकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या समस्या जाणून घेत झुरुंगे जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.

स्थानिक तरुणाई, ग्रामस्थ व सामाजिक संघटनांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता या गटातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.

झुरुंगे म्हणाले, माझा उद्देश सत्तेचा नाही, सेवाभावाचा आहे. मी या भूमीचा मुलगा आहे, म्हणून लोकांसाठी झटणं माझं कर्तव्य आहे. विकास, शिक्षण, रोजगार आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस योजना घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे.

दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर लोणीकंद–पेरणे परिसरात राजकीय समीकरणे हलू लागली आहेत. आगामी काही दिवसांत झुरुंगे यांच्या प्रचारयात्रा आणि संपर्क मोहिमा गती घेतील अशी चिन्हे दिसत असून, या गटातील लढत आता अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.