March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
             देश आणि समाजासाठी आदर्श युवक घडविण्याची कार्यशाळा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना असल्याचे  प्रतिपादन शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख व प्रसिद्ध भाषा अभ्यासक डॉ. ईश्वर पवार यांनी केले.    

तळेगांव ढमढेरे (ता.शिरुर)  येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. पवार बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश  ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. अशोक नवले, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. संदीप सांगळे, डॉ. पराग चौधरी व प्रा. मिनाक्षी पोकळे आदी याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. पवार पुढे म्हणाले की काळानुसार आपल्यापुढील आव्हाने देखील बदलत आहेत. त्यामुळे युवकांनी देखील सकारात्मक जीवनशैली आत्मसात करुन बदलले  पाहिजे. क्रांतिकारक, समाजसुधारक हे आपल्यापुढील आदर्श असायला हवेत. त्यामूळे  राष्ट्रीय सेवा योजना सारखे व्यासपीठ हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगीतले. प्रथम राष्ट्र आणि समाजहित हेच आपले प्राधान्य असायला हवे. युवकांनी त्यासाठी स्वतःला सिद्ध करणे काळाची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश ढमढेरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व याप्रसंगी विषद केले. पदवी बरोबरच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधून यशस्वी नागरिक बनण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून राष्ट्रीय सेवा योजना हे त्यासाठी उत्तम व्यासपीठ असल्याचेही महेश ढमढेरे यांनी सांगीतले. शिक्षण प्रसारक मंडळ सातत्याने सामाजिक बांधिलकी जोपासत असून विवीध घटकांतील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. शिस्त आणि धर्मसंस्कृतीचे पालन युवकांनी करायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त आज महाविद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी केले. डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.डॉ. सोमनाथ पाटील यांनी आभार मानले.

प्रा. डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. पद्माकर गोरे, डॉ. मनोहर जमदाडे, डॉ. अमेय काळे, प्रा. अविनाश नवले, प्रा. किशोर आढाव, प्रा. जनार्दन गिरमकर , प्रा. केशव उबाळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.