या घटनेसंदर्भात बोलताना औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यल्लमपल्ली यांनी म्हटलं की, रुग्णालयातील परिचारिकेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला आहे. संबधित परिचारिकेला निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. यल्लमपल्ली यांनी दिली.
सोनवणे यांचा ब्लड ग्रुप हा ए पॉझिटिव्ह होता, तर कांबळे यांचा ब्लड ग्रुप बी पॉझिटिव्ह होता.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन्ही रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला, मात्र निष्काळजीपणामुळे दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असताना त्यांना बी पॉझिटिव्ह रक्त पुरवण्यात आले, तर कांबळे यांचा यांचा रक्त गट बी पॉझिटिव्ह असताना त्यांना ए पॉझिटिव्ह रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. दोन्ही रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं आहे. दोन्ही रुग्णांना रक्त चढवत असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत होत्या, आणि त्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
