यावेळी वढू बुद्रुक तसेच तुळापूर या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या गावांना धार्मिक तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणारा असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली,
उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही साधू-संतांची, वीरांची भूमी आहे. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढणारे राजे होते. त्यांच्या स्मृती स्थळाच्या विकासासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
विकास कामे करताना पावित्र्य कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी. दोन्ही स्थळांचा राज्याच्या लौकिकाला साजेसा विकास करण्यात येईल. या कामाला गती देऊन दर्जेदार कामे करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असल्याचे सांगून वढू व तुळापूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिली.
आजच्या बलिदान दिना निमित्त समाधी तसेच आसपासच्या गावांमध्ये कडक मृत्युंजय मास पाळण्यात आला, सकाळी साडेपाच वाजता धर्मवीर शंभूराजे युवा मंच, ग्रामपंचायत वढू बुद्रुक तसेच मातृशक्तीच्या वतीने समाधीचे पूजन करण्यात आले, मुखपद यात्रेनंतर नऊ वाजता शासकीय पूजा करण्यात आली, दरम्यानच्या काळात शंभुराजे, कवी कलश, शंभू राजांचा पुतळा यावर फुलांच्या आकर्षक सजावट करण्यात आली होती,
समाधी स्थळी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये अनेक पारंगत कीर्तनकारांची कीर्तने झाली, खासदार उदयनराजे भोसले यांनी समाधीचे दर्शन घेतले, शासनाच्या वतीने पार्किंगची सुविधा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता,
पुणे शहर व पिंपरी चिंचवड या शहरांपासून बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती, स्वच्छतागृहे, आरोग्य व्यवस्था, देण्यात आली होती, शंभू भक्तांना अन्नदान त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,
बलिदान दिन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याच्या वतीने पुणे नगर महामार्ग तसेच आसपासचे रस्ते त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा ते वढू रस्त्यावर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला होता, सुरक्षेसाठी बॉम्ब शोध पथक, श्वान पथक, तैनात करून योग्य काळजी घेतली गेली,
यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रदीप दादा कंद, महंत रामगिरी महाराज, पुरुषोत्तम मोरे, माणिक मोरे, अक्षय महाराज भोसले तसेच वढू ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते,
यावेळी महंत रामगिरी व आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी आपले विचार मांडले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते महंत रामगिरी महाराज यांना धर्मवीर संभाजी महाराज पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात धर्म रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना शंभूसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
वढू गाव हे महाराष्ट्राचे उर्जास्थान आहे. वढू हे स्वराज्य तीर्थ असून या स्वराज्य तीर्थाकडून मिळणारी शक्ती एकवटून महाराष्ट्राला प्रगती पथावर घेऊन जायचे आहे, असे सांगून गोमातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. गोशाळेला अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. आवश्यकता असल्यास गोहत्या रोखण्यासाठी आणखी कडक कायदा करण्यात येईल.
गोरक्षकांचे काम करणाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच ग्रामस्थांच्या मागणीनुसार दरवर्षी आजच्या बलिदान दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यानच्या काळात पोलीस खात्याच्या वतीने सशस्त्र जवानांनी शासकीय मानवंदना दिली, समाधीचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर शंभू भक्तांची लाईन लागली होती, बलिदान दिन चांगल्या प्रकारे साजरा होण्यासाठी वाहतुकी विभागाच्या वतीने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले होते,
