शिरूर तालुका मनसेचे सदस्य शामराव बेंडभर यांनी पिंपळे जगतापचे सरपंच व ग्रामसेवक यांना दिलेल्या निवेदनानुसार लोकवस्ती लगत विविध प्रकारचा कचरा टाकला जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली असून स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिंपळे जगताप ग्रामपंचायत हद्दीमध्ये चौफुला येथे लोक वस्तीत एनएच ५४८ डी महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
तसेच व्यावसायिकांकडून दररोज या ठिकाणी ओला व सुका कचरा टाकला जातो. कचऱ्यामुळे सर्वत्र अस्वच्छता होऊन दुर्गंधी पसरली आहे. तसेच हा कचरा अधून-मधून पेटवला जात असल्याने मोठ्या प्रमाणात धुर होतो. त्यामुळे वायुप्रदूषणाबरोबरच धुरामुळे 100 मीटर पर्यंतची वाहने दिसत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ताबडतोब स्थानिक प्रशासनाने कचऱ्याची विल्हेवाट लावावी व पुन्हा या ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी. कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतने कारवाई करावी अशी मागणीही या निवेदनाद्वारे बेंडभर यांनी केली आहे. ग्रामसेवक केंज यांना निवेदन देताना शामराव बेंडभर यांच्या समवेत मनसे सैनिक संतोष सोडेकर, गणेश नाईकनवरे, आजिक्य तांबेे, भुषण शितोळे आदी उपस्थित होते.


