March 30, 2026
धानोरे येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा संपन्न कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांची माहिती

धानोरे येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी मेळावा संपन्न कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांची माहिती

सुनील भंडारे पाटील

ऊस पिकावरील हुमणी नियंत्रण, सुपर केन नर्सरी आणि महाडीबीटी अर्जांबाबत सविस्तर मार्गदर्शन धानोरे (तालुका शिरूर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर धानोरे येथे शेतकरी मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना आगामी हंगामाचे अचूक नियोजन करण्याच्या दृष्टीने विविध कृषी तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांसह सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक सहायक कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम औधोरेखित करत, ‘अल निनो’ (Al Nino) च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी व कशा प्रकारे पीक पद्धतीचे नियोजन करावे, यावर प्रकाश टाकला.

बाजारातून बियाणे खरेदी करताना केवळ प्रमाणित बियाण्यांचाच (Certified Seeds) वापर करावा, जेणेकरून उगवण क्षमता उत्तम राहील आणि फसवणूक टळेल, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, बाजरी, मूग आणि तूर या खरीप पिकांच्या दर्जेदार व महाडीबीटी अंतर्गत अनुदानित बियाण्यांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर तातडीने ऑनलाइन अर्ज करण्याचे जाहीर आवाहन शेतकऱ्यांना केले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया व लागणारी कागदपत्रे याविषयी त्यांनी सविस्तर तांत्रिक माहिती दिली.

या मेळाव्याला वॉटर फाउंडेशन’च्या प्रियंका साबळे मॅडम या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जलसंधारण, पाण्याचे नियोजन आणि आधुनिक कृषी पद्धतींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ऊस पिकावरील हुमणी नियंत्रणासाठी ‘प्रकाश सापळा’ (Light Trap) प्रात्यक्षिकाचे केलेले आयोजन. हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे ऊस पिकाचे मोठे नुकसान होते. पावसाच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात, त्यांना आकर्षित करून नष्ट करण्यासाठी प्रकाश सापळा अत्यंत प्रभावी व कमी खर्चाचा उपाय कसा ठरू शकतो, याचे थेट प्रात्यक्षिक यावेळी शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.

यासोबतच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणाऱ्या ‘सुपर केन नर्सरी’ (Super Cane Nursery) या आधुनिक पद्धतीची माहिती देण्यात आली. कमी पाण्यात आणि कमी खर्चात उसाचे दर्जेदार बेणे कसे तयार करावे, याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच हुमणी नियंत्रणासाठी (White Grub Management) इतर जैविक आणि रासायनिक उपायांचीही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या शेतकरी मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विजय माशेरे, सागर दरेकर, मंगेत झगडे, ज्ञानोबा झगडे, मनीषा ढोले, काळुराम ढोले, पांडुरंग झगडे, विलास हंबीर, कैलास हंबीर, बाळु झगडे, रमेश झगडे, अवधुत झगडे, किरण ढोले, सौरभ झगडे, संदीप झगडे यांच्यासह गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभाग आणि वॉटर फाउंडेशनच्या वतीने मिळालेल्या या मौल्यवान मार्गदर्शनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

Loading