March 30, 2026
माळवाडी येथे  बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार..
शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे … दामुशेठ घोडे आदर्श सरपंच टाकळी हाजी

शिरूर विशेष प्रतिनिधी
         शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील शेतकरी अशोक कानडे यांच्या  शेळी वर मंगळवारी रात्री साडेआठ च्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला आहे.   

 कानडे हे शेतात राहत असून त्यांच्या गोठ्याला तारेचे कंपाऊंड केलेले आहे.तिथे सहा शेळ्या बांधलेल्या होत्या. कंपाऊंड उचकटून बिबट्याने हल्ला केला, शेळी  बांधलेली असल्याने वाघाला तिला ओढून नेणे शक्य झाले नाही. शेळ्यांच्या आवाजाने घरातील व्यक्ती बाहेर आले , तेव्हा त्यांनी बिबट्या शेळी ओढून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहिले, बिबट्याला काठीचा धाक दाखविण्यात आला , परंतु तरीही बिबट्या शेळी सोडत नव्हता. शेवटी फटाके फोडल्यानंतर बिबट्याने पळ काढला.    

  वनविभाग कर्मचारी यांना कळविल्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी येवून पंचनामा केला आहे. पावसाळा सुरू असल्याने शेतकरी घरात निवाऱ्याला असतात,परंतु पशुधन धोक्यात आल्याची चिंता माळवाडी चे शेतकरी वसंत टिळेकर यांनी व्यक्त केली आहे.

           या भागातील अनेक शेतकरी शेतात राहत असून सर्वांनी काळजी घेवून घराला, गोठ्याला कुंपण करून घेणे गरजेचे आहे असे आवाहन टाकळी हाजीचे आदर्श सरपंच दामू शेठ घोडे यांनी केले,
            शेतकऱ्यांनी घराबाहेर पडताना स्वतःची, लहान मुलांची तसेच जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.