March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
            शिक्षकांच्या वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यास रविवार (दि. ३१ जुलै) पर्यंत मुदत वाढ दिली आहे. शासनाच्या वतीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.डी.सिंह यांनी यासंबंधीचे परिपत्रक शुक्रवार (दि.१५ जुलै) रोजी काढले आहे.       

 महाराष्ट्रातील शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात (दि. ०१ जून २०२२) पासून राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी ऑनलाईन स्वरुपात यशस्वीरीत्या सुरु आहे. राज्यात एकूण ९४ हजार ५४१ प्रशिक्षणार्थ्यांनी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केलेली होती. यापैकी दिनांक १४ जुलै २०२२ रोजी पर्यंत ५२ हजार ५५१ प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षण पूर्ण करत आहेत. अशा उर्वरित प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण दि. ३१ जुलै २०२२ पूर्वी पूर्ण करावे असे आदेश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.

तथापि ज्या प्रशिक्षाणार्थ्यांचे प्रशिक्षण त्यांच्या ईमेल मध्ये असणाऱ्या दुरुस्ती, प्रशिक्षण गट व प्रकार यामध्ये असणाऱ्या त्रुटी यामुळे उशिरा सुरु झाले आहे; अशा प्रशिक्षणार्थ्याना दुरुस्तीनंतर त्यांचे प्रशिक्षण सुरु झालेल्या दिनांकापासून पुढील ४५ दिवसात आपले प्रशिक्षण पूर्ण करावे.तसेच सर्व प्रशिक्षाणार्थ्यांना सूचित करण्यात येते की दि. २३ व २४ जुलै, २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड मार्फत “सेवा अद्ययावतीकरण” या तांत्रिक कारणास्तव प्रशिक्षण प्रणाली बंद असणार आहे. या दोन दिवस कृपया प्रणालीचा वापर करू नये. दिनांक २५ जुलै,२०२२ पासून प्रणाली वापरासाठी नियमितपणे सुरु असेल, तरी याची नोंद वरिष्ठ व निवडश्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांनी घ्यावी असे आवाहनही या परिपत्रकात करण्यात आले आहे.