पुणे जिल्हा प्रतिनिधी
राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्ष पदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यसभेच्या निवडणुकी साठी हर्षवर्धन पाटील यांनी तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र त्यांना तिकीट नाकारल्या नंतर भाजपा कडून त्यांच पुनर्वसन करण्यात आलं आहे. तसेच गुजरातचे केतन भाई पटेल यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, 50 वर्षाच्या इतिहासात प्रथमच साखर संघावर भाजपचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचं पाहायला मिळत आहे. ऊसाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचं मोठं वर्चस्व आहे.
त्यामुळेच महाराष्ट्राला राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे देशातील सहकारी साखर कारखान्यांची राष्ट्रीय पातळीवरील काम करणारी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ ही महत्त्वाची प्रमुख संस्था आहे. देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगां पुढील अडचणी केंद्र सरकारकडून सोडवून घेण्याचे काम राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या माध्यमा तून करण्यात येते.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्ष पदी निवड केल्यामुळे त्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. या निवडीमुळे हर्षवर्धन पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा एकदा आले आहेत.
