याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जुनी जेजुरी येथील बल्लाळेश्वर मंदिर परिसरात एका तरुणास साप चावल्याची घटना घडली. साप चावलेल्या तरूणानेच स्वतःला सावरत १०८ या क्रमांकावर संपर्क करून रुग्णवाहिकेची मदत मागितली. घटनास्थळी रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध झाल्याने सदर रुग्णास जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उचारासाठी दाखल करण्यात आले.
परंतु ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी वेळेवर डॉक्टरच नसल्याने साप चावलेल्या तरुणावर पुढील उपचारासाठी तब्बल 2 तासापेक्षा जास्तीचा कालावधीची प्रतीक्षा करावी लागली. मॉर्निंग ड्युटी साठी असणारे डॉ. प्रबंध भिसे वेळेवर हजर नसताना देखील जेजुरी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सोनवणे हे नाईट ड्युटी करून सकाळी ९ वाजता घरी निघून गेले होते. सकाळी ९ वाजताची ड्युटी आहे हे माहिती असून देखील ११ वाजले तरी देखील डॉ. भिसे यांची रुग्णालयात उपस्थिती नव्हती.
याची माहिती स्थानिक पत्रकार यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला गेला.



