March 30, 2026
एक दिवस दिल्लीसह देशातील मान्यवर कोरेगाव भीमा पाहण्यासाठी येतील-आदर्श सरपंच संदीप ढेरंगे

“एक दिवस दिल्लीसह देशातील मान्यवर कोरेगाव भीमा पाहण्यासाठी येतील”-आदर्श सरपंच संदीप ढेरंगे

सुनील भंडारे पाटील

दिल्ली : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या भव्य सोहळ्यासाठी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे हे सपत्नीक माजी ग्रामपंचायत सदस्या अंजली ढेरंगे यांच्यासह ग्रामस्थांसह विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. हा क्षण कोरेगाव भीमाच्या इतिहासातील अभिमानास्पद ठरला.

या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होताना संदीप ढेरंगे भावूक झाले. त्यांनी सांगितले, “आज आम्हाला दिल्लीला बोलावलं आहे, पण एक दिवस असा येईल की दिल्लीसह देशभरातील मान्यवर कोरेगाव भीमाचा विकास पाहण्यासाठी आमच्या गावात येतील.”

एनसीसीमध्ये असताना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहणाचा सोहळा पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते. आज त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि गावासाठी केलेल्या विकासकामांमुळे ते स्वप्न सत्यात उतरले आहे. या प्रवासामुळे केवळ त्यांना नव्हे, तर कोरेगाव भीमाच्या प्रत्येक ग्रामस्थाला अभिमान आणि गौरवाची अनुभूती मिळाली आहे.

सरपंच पदावर असताना संदीप ढेरंगे यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कामे केली. पिण्याच्या पाण्यासाठी वन विभागाची जागा मिळवून टाकी उभारणे, नरेश्वर तळ्यातील गाळ काढून जलसाठा वाढवणे, शेती आणि उद्योगधंद्यांसाठी पाणी उपलब्ध करून देणे या कामांमुळे गावाच्या विकासाचा आलेख सतत उंचावत गेला.

पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेलं निमंत्रण हे त्यांच्या प्रामाणिक कार्याची खरी पोचपावती आहे. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, हा सन्मान त्यांचा नसून संपूर्ण कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचा आणि प्रत्येक ग्रामस्थाचा आहे.

१९५२ साली ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच कोरेगाव भीमा येथील सरपंच सपत्नीक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. या घटनेने गावाच्या इतिहासात सुवर्णपान लिहिले गेले आहे.

संदीप ढेरंगे यांच्या आत्मविश्वास, मेहनत आणि गावासाठीच्या निष्ठेमुळे आज कोरेगाव भीमा हे केवळ एका गावाचे नाव राहिलेले नाही, तर पुणे जिल्ह्यातील आदर्श विकास मॉडेल गाव ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनी कोरेगाव भिमाचे आदर्श सरपंच संदीप ढेरंगे, माजी ग्राम पंचायत सदस्या अंजली ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पि के अण्णा गव्हाणे, माजी संचालक कैलास सोनवणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी चेअरमन पंडित ढेरंगे,माजी सरपंच अमोल गव्हाणे, ग्राम पंचायत सदस्या रेखा तानाजी ढेरंगे, जयश्री दिपक गव्हाणे, कोमल प्रदीप खलसे, दीपक उत्तम गव्हाणे, तानाजी शंकरराव ढेरंगे, प्रदीप दशरथ खलसे, आशुतोष अविनाश देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.