March 30, 2026
शिरूर विशेष प्रतिनिधी
           शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या कुंड तिर्थक्षेत्र येथील तमाम राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  मळगंगा मंदीरात सोमवार दि.२६ रोजी विधीपूर्वक घटस्थापना करण्यात आली.

टाकळी हाजी च्या सरपंच अरूणा घोडे, ग्रामपंचायत सदस्या अनिता जाधव ,देवीचे पुजारी रामदास किऱ्हे व त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्य यावेळी उपस्थित होते. पुजा अर्चा, अभिषेक व त्या नंतर घटस्थापना करण्यात आली. गेली अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.गेली दोन वर्ष कोरोना काळात शासनाच्या नियमानुसार नवरात्र उत्सव  साजरा करण्यासाठी मर्यादा आल्या होत्या. यावर्षी मात्र नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. 

            नवरात्रीच्या उत्सवात राज्यातील विविध भागांतून फार मोठ्या संख्येने भाविक कुंड येथे नियमीत येत असतात. नवरात्र उत्सव निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. निघोज, टाकळी हाजी परिसरातील भाविक कुंडावर पायीवारी करीत दररोज पहाटे सहा ते आठ या दरम्यान उपस्थीत राहून महा‌आरतीचा लाभ घेऊन दर्शन घेतात.तसेच मळगंगा देवीच्या गावातील मंदीरात दररोज सायंकाळी महाआरती करण्यात येते. यावेळी हजारो भाविक या महाआरती व दर्शनासाठी गर्दी करतात.