March 30, 2026
वाघोलीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष लक्ष 
नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार वाघोलीत येऊन घेणार ग्राउंड रिपोर्ट; कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनावर देणार भर 
सुनिल भंडारे पाटील 
                पुणे शहरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आढावा घेत असताना वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे विशेष लक्ष असणार असून येथील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आयुक्त स्वतः वाघोलीत येऊन वाहतूक कोंडीचा आढावा घेणार आहेत.

                   पुणे शहरात वाहतूक कोंडी झालेल्या रस्त्यांवर किंवा चौकात पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करणे अपेक्षित आहे. एकीकडे वाहतूक कोंडी झालेली असताना, दुसरीकडे पोलिस कर्मचारी दंडात्मक कारवाई करत असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही,’ असा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी वाहतूक शाखेतील कर्मचार्‍यांना दिला आहे. दिवसेंदिवस शहरात वाहतूक कोंडी वाढते आहे. मेट्रोचे सुरू असलेले काम, वाहनांची वाढती संख्या, अपुर्‍या पायाभूत सुविधा अशी विविध कारणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस सतत वाहतूक कोंडी होणार्‍या स्पॉटचा अभ्यास करून तात्काळ उपायोजनेवर भर देतील. त्यानंतर दीर्घकाळ उपायोजना करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

                 पुणे शहरातील वाहतूक कोंडीच्या हॉटस्पॉटची माहिती घेतल्यानंतर पुणे-नगर रोडवर विशेषत: वाघोली परिसरात कोंडीची समस्या मोठी असल्याचे आयुक्तांना कळाले. त्यानुसार वाघोली परिसरातील कोंडीचा अभ्यास करण्यात येत आहे. कोंडीमागील कारणांचा शोध घेतला जाणार आहे. वाघोलीत प्रत्यक्ष जावून पाहणी देखील करणार आहेत. अभ्यासानंतर तातडीने करावयाच्या उपाययोजना पोलिसांकडून करण्यात येतील. तर तांत्रिक उपाययोजना संबंधित विभागाच्या मदतीने करण्यासाठी पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.