March 30, 2026
पुणे जिल्हा प्रतिनिधी
                महाराष्ट्र राज्यातील भूमिअभिलेख विभागाची सुमारे 4 कोटींहून अधिक जुनी कागदपत्रे नागरिकांना पाहण्यासाठी ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सध्या राज्यातील 12 जिल्ह्यांतील जुनी कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध आहेत.उर्वरित जिल्ह्यांतील कागदपत्रे लवकरच ऑनलाइन करण्यात येणार आहेत. केंद्र शासनाने नागरिकांना ऑनलाइन अधिकार अभिलेख उपलब्ध करून देण्याचा निर्णय सन 2011 मध्ये घेतला. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय भूमी अभि लेखांचे आधुनिकी करण कार्यक्रम सुरू केला होता. खालील वेबसाईट तयार करण्यात आली आहे,
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in 

           त्यानुसार जिल्हानिहाय विभागणी करून फेरफार, सातबारा, आठ-अ, कडई पत्रक, हक्क नोंदणी पत्रक, इनाम पत्रक, जन्म- मृत्यू, लेजर बूट, खासरा पत्रक, जोड तक्ता, कुळ नोंदणी, पेरे पत्रक, रेकॉर्ड हक्क पत्रक, गाव नकाशा, टिपण अशा जवळपास तेवीस कागदपत्रांचे तहसील स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच, हक्क नोंदणी वही, गुणाकार पुस्तक, आकार फोड, कजाप, दशमान, शेत पुस्तक, पुरवणी पत्रिका, ताबे पावती, शेतवार, पोट हिस्सा पत्रक- टिपण, निस्तार, चौकशी, शहर सर्वेक्षण पुस्तिका अशा सुमारे विस पेक्षा अधिक कागदपत्रांचे भूमिअभिलेख स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहेत.

            तहसील स्तरावर सहा जिल्ह्यांतील तीन कोटी त्र्याहात्तर लाख एकशे अठ्ठ्यांनव कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तर भूमिअभिलेख स्तरावर सहा जिल्ह्यांतील चार लाख तीन हजार तिनशे पन्नास अभिलेख डिजिटल स्वाक्षरी युक्त केले आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील संगणकी करणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे अभिलेख भूमिअभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तहसील स्तरावर नाशिक, नगर, धुळे, नंदूरबार, जळगाव, ठाणे या जिल्ह्यांमधील तब्बल तीन कोटी त्र्याहात्तर लाख एकशे अठ्ठ्यानव अभि लेखांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच, सातारा, गोंदिया, नंदूरबार, जालना, लातूर, अमरावतीतील भूमिअभिलेख स्तरावर चार लाख तीन हजार तिनशे पन्नास अभिलेख डिजिटल स्वाक्षरी युक्त केले आहे. असे एकूण तीन कोटी सत्त्याहत्तर लाख तीन हजार पाचशे आठ्ठेचाळीस कागदपत्रांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे, असे भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले आहे.