March 30, 2026

सुनील भंडारे पाटील

                   लोणीकंद (तालुका हवेली) येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीच्या श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक योगदिन २१ जून रोजी मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
 “योग – सुसंवाद व शांतीसाठी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन हार्टफुलनेस संस्था आणि महाविद्यालयाच्या एन एस एस, क्रीडा व एस.डब्ल्यू.ओ. विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संस्थापक सचिव शंकर भूमकर होते, खजिनदार उद्धव भूमकर, तांत्रिक संचालक सिद्धांत भूमकर, तसेच डीएमटी कंपनीचे संचालक विक्रम मखवाना यांच्या प्रमुख उपस्थितीत योगदिन साजरा करण्यात आल्याचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कार्यक्रमात विशेष योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये – विनय गुप्ता, हार्टफुलनेस संस्थेचे प्रसिद्ध योग प्रशिक्षक, देवेंद्र थत्ते, मायक्रोसॉफ्टचे प्रतिनिधी,
हर्बल जावळे, उपाध्यक्ष, झेन्सार कंपनी, गौतम सागर, इन्फ्रास्ट्रक्चर अभियंता, टीसीएस, नेहा रावत, शैक्षणिक तज्ज्ञ, यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
बी-बिल्डिंगच्या मेकॅनिकल विभागातील सेमिनार हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. हार्टफुलनेस योग प्रशिक्षक विनय गुप्ता यांनी उपस्थितांना योगासने, ध्यान व श्वसन तंत्रांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या घोषवाक्याशी एकात्मभावाने बांधिलकी व्यक्त केली. योगाची जीवनशैलीमधील भूमिका आणि त्याचे मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याबाबत उपस्थितांना जाणिव जागृती झाली.