March 30, 2026
सासवड प्रतिनिधी बाप्पु मुळीक 
      पुरंदर तालुक्यात महावितरण विभागाच्या गलथान कारभार दिवसेंदिवस वाढत असून वेळेचे कोणतेही नियोजन नसल्याने सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. तालुक्यातील वाळूंज येथे याच गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याला आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.   

विजेच्या खांबावरील तार तुटलेली माहिती असतानाही विद्युत प्रवाह बंद न करता तसाच सुरु ठेवल्याने एका शेतकऱ्याचा धक्का लागला आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय केरबा भालेराव, वय ५५ वर्षे, मूळ रा. भिगवण, ता. इंदापूर. सध्या रा. वाळूंज, ता. पुरंदर असे या घटनेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत धनंजय किसन क्षिरसागर, रा. शिवरी, ता. पुरंदर यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि, वाळूंज येथील शेतामधून जाणाऱ्या खांबावरील विजेची तार तुटल्याने विद्युत वितरण विभागाला याबाबत माहिती देण्यात आली होती. परंतु याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.

       दरम्यान दि. २९ रोजी सकाळी ७. ४५ च्या दरम्यान संजय केरबा भालेराव हे देवपूजेसाठी फुले तोडून आणण्यासाठी घरासमोरील फुलांच्या शेतात गेले. फुले तोडत असताना त्यांचा तारेला धक्का लागला. परंतु विद्युत प्रवाह सुरु असल्याने त्यांना ४४० व्होल्टचा जोरदार धक्का बसून दूरवर फेकले गेले. त्यांच्या मानेला तारेखा विळखा बसून संपूर्ण शरीरात विद्युत प्रवाह शिरल्याने बेशुद्ध होवून पडले.त्यांना  तातडीने शिवरी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर सासवड येथील पोलीस ठाण्यात घटनेची खबर देवून ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. जेजुरीचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे. 
शिवरी, वाळूंज भागातील शेतातील जाणाऱ्या सर्वच विजेच्या खांबावरील तारा ओढून घेण्याची अनेक दिवसांपासून मागणी केली आहे, हाताला तारा लागत असल्याने आम्हाला शेतात काम करताना जीव मुठीत घेवून काम करावे लागत आहे. परंतु महावितरण विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक वारंवार दुर्लक्ष करीत असून त्यांच्या गलथान कारभारामुळेच घटना घडल्याचा आरोप केला आहे. किमान आता तारी तारा ओढून घेणार कि आणखी शेतकऱ्यांचा जीव जाण्याची वाट पाहत आहात ? असा उद्विग्न सवाल उपस्थित करून केला आहे.