पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने घरातील गृहिणी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सर्व क्षेत्रात पुढे येत आहे. संपर्कासाठी ‘मोबाईल’ वापरात असलेल्या स्मार्टफोनच्या सोशल मीडियातील प्लॅटफॉर्मवर जगातील माहिती उपलब्ध आहे. परंतु, भारतात संविधानिक अधिकार आणि वैचारिक स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता आणि बीभत्सतेचा नंगानाच मोबाईल मध्ये अहोरात्र सुरू आहे. यातील लाखो पोर्न वेबसाईट आणि सेन्सॉर बोर्डाच्या नियंत्रण कक्षेबाहेर असणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मालिकांमधून मोबाईल फोनच्या आहारी गेलेल्या युवक, युवतींच्या कामुक भावनांना उत्तेजन दिले जाते. यावर पोलीस, प्रशासनाचे नियंत्रण नाही आणि कायद्याचेही बंधन नाही. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व अनेक वेबसाईटवर सेक्स मेडिसिन, सेक्स टॉईज, एस्कॉर्ट सर्विसच्या नावाखाली बेरोजगार युवक, युवतींना अतिरिक्त उत्पन्नाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात ढकलले जाते. याला सर्वसामान्य गृहिणींपासून महाविद्यालयीन युवक युवतींसह बॉलीवूड, टॉलीवूड तसेच मालिकांमधील अनेक महिला बळी पडले आहेत. अमेरिका, चीन आणि अनेक प्रगत राष्ट्र व दुबई आणि इस्लामिक राष्ट्रांमध्ये अशा सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आणि पोर्न वर बंदी आहे. चीन, दुबई, इजिप्त, अफगाणिस्तान सह काही इस्लामिक राष्ट्रांमध्ये तर बलात्काऱ्यांना खुलेआम नागरिकांसमोर फाशी दिली जाते.
