पत्नीने पतीला ओवाळून (नीरांजन विधी) हवी ती भेट वसूल करण्याचा स्त्रीहट्ट पुरवून घेण्याचा हा दिवस. याची खुमारी ज्याची त्यानेच अनुभवावी. पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन खुप महत्त्वाचा आहे.
परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परां विषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. आपल्या मनात दिवाळीतल्या पाडव्याविषयीचं एक पारंपरिक चित्र, एक संकल्पना असते.
वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडला आहे आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर लख्ख दिसत आहे.
आजही हे चित्र बदललेलं नाही. स्त्रीनं पुरुषांच्या बरोबरीनं किंवा काकणभर अधिकच सर्वच क्षेत्रांत यशाची शिखरं गाठली आहेत. तरी आपलं घरकुल प्रेमानं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन डोळय़ांत तेल घालून करणारी, कुटुंबातलं सामंजस्य, नात्यांतला स्नेह यांची जोपासना जाणीवपूर्वक करणारी ही तिची भूमिका ती आजही तितक्याच जिव्हाळय़ानं साकारते आहे.
तिची ही शक्ती, तिचं हे सामथ्र्य जाणूनच पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो. याच दिवशी सौर हेमंत हा ऋतू आणि भारतीय कार्तिक मासारंभ होतो,
