इंदापूर येथील सांगता सभेत शरद पवार गटाला मदत करणाऱ्यांना अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे मामा यांनी दम दिला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी याबाबतची माहिती जाहीर सभेत दिली आहे. आम्हाला मदत करणाऱ्या सर्वसामान्यांना दमदाटी करण्यात आली आहे.शेतात पाणी सोडणार नाही म्हणून दम दिला गेला आहे. अरे मामा, जरा जपून. तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असा दमच शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे मामा यांना भरला. इंदापूर मधील झालेल्या जाहीर सभेतून शरद पवार यांनी हा इशारा दिला आहे.
इंदापुरात एक वेगळी स्थिती आहे. तुमच्या सामुदायिक शक्तीने सत्ता हातात आल्यावर इंदापूर चा विकास होईल. पण इथल्या एका आमदारा कडून दमदाटी सुरू आहे. इथल्या एका व्यक्तीला मी आमदार केल होते. मी मंत्री केले होते. तीच व्यक्ती लोकांना दमदाटी करत आहे. काही लोक माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की, आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. पण ते दमदाटी करत आहेत. आम्हाला तुमच्या पक्षाला सहकार्य करायचं आहे. पण आम्हाला सांगण्यात आलं की या लोकांना सहकार्य केलं तर तुमच्या शेतीच पाणी बंद करू. ही मोठी गंमतीशीर गोष्ट आहे. शेतीच पाणी यांच्या बाप जाद्यांची इस्टेट नाही. मी त्यांना एवढंच सांगू शकतो, अरे मामा जरा जपून. तुला सांगतो हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला मला वेळ लागणार नाही, असा इशाराच शरद पवार यांनी यावेळी सभेला संबोधित करताना दिला आहे.
तुझ्यासाठी आम्ही काय केल नाही? तुझ्यासाठी आम्ही काय गोष्टी केल्या नाहीत? गुजरातमधून औषध कंपनीच्या एजन्सी त्यांना हव्या होत्या. त्या मी त्यांना आणून दिल्या. आणखी काही दुकानांसाठी मदत पाहिजे होती ती मि त्यांना दिली. लहान समाजातील लोक येतात. त्यांना उभ करण्यासाठी पाठिंबा देण गरजेचं असते, ती भूमिका मी घेतली. त्याचा परिणाम असा झाला त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. त्यांचे पाय हवेत आहेत. त्यांचं डोकं हवेत आहे. त्यांना एवढंच सांगू इच्छितो, या तालुक्यात कुणीही सत्तेचा वापर करू नये. तुम्हाला कुणी दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा. सत्ता आणि सत्तेचा माज उतरवण्यात मला वेळ लागणार नाही, अस यावेळी शरद पवार म्हणाले आहे.