March 30, 2026
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
          पुणे : तीन तलाक ची प्रथा आजही चालू अशीच एक घटना कोंढवा (तालुका हवेली) येथे घडली आहे.पत्नी आणि मुलीची जबाबदारी न घेता पत्नीला तोंडी तलाक देऊन पळून जाणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.    

कौटुंबिक हिंसाचार, अपहार, मारहाण करणे, धमकावणे तसेच मुस्लीम महिला कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. डी. पाटील यांनी दिले आहेत.याबाबत एका तरुण विवाहितेने  आकीब अयुब मुल्ला  (वय ३२ रा. कोंढवा) आणि सासरच्यांविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबर २०१६ मध्ये दोघांचा विवाह झाला होता. विवाहापूर्वी सासरच्यांनी स्थावर मालमत्तेबद्दल सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे मालमत्ता नव्हती. तक्रारदार महिला आणि तिच्या मुलीचा खर्चही तिचे आई  वडील करत होते. माहेरहून पैसे आणण्यासाठी पती आणि सासरची मंडळी तगादा लावत होते. त्यासाठी तिला मारहाण, शिवीगाळ केली जात होती.महिलेला नोकरी करण्यासाठी  दबाव टाकला जात होता.  सासरच्यांनी तिच्या पतीला तलाक देण्यास  प्रवृत्त केले. त्यानुसार तोंडी  तलाक देऊन तो पसार झाला.  त्यानंतर  तिने न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुल्ला याच्यासह त्याच्या आई, वडील, बहीण, मेहुण्याविरुद्ध  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुल्ला याला अटक करण्यात आली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.