March 30, 2026
वाघोली पोलिसांचा पर्यावरण पूरक उपक्रम देवराई प्रकल्पात वृक्षारोपण 

सुनील भंडारे पाटील

बकोरी ( ता. हवेली ) येथे वाघोली वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय लिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बकोरी येथील देवराई प्रकल्पात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे.

या उपक्रमाद्वारे पोलिसांनी ‘एक झाड – एक श्वास’ या संकल्पनेला चालना देत नागरिकांनाही वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित केले.

देवराई प्रकल्पात आज लावलेली ही झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवे श्वास घेऊन येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक लिंगाडे यांनी सांगितले की, “केवळ कायदा व सुव्यवस्था राखणे एवढेच आमचे कार्य नाही, तर सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमात सहभाग घेणे हीसुद्धा आमची जबाबदारी आहे.

तसेच लिंगाडे यांनी देवराई प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांचे वृक्षसंवर्धनासाठी सुरू असलेल्या अतिशय उत्कृष्ट कार्याबद्दल विशेष कौतुक केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

त्यावर उत्तर देताना चंद्रकांत वारघडे म्हणाले, “वृक्षसंवर्धनात पोलिसांचा सहभाग हा इतरांसाठी प्रेरणादायक आहे असे मत व्यक्त केले व पोलीस प्रशासन समाजप्रबोधनातही पुढाकार घेत आहे, हे अत्यंत स्वागतार्ह आहे.