मोझे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ईन-सेमच्या परीक्षा विद्यापीठाने पुढे ढकलल्या विद्यार्थी संतप्त; राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलनाचा इशारा
वाघोली प्रतिनिधी
वाघोली येथील मोझे इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये ईन-सेम २०१९ पॅटर्नच्या तृतीय व चतुर्थ वर्षाची ईनसेम परीक्षा एकदिवस अगोदर पुणे विद्यापीठाने अचानक पुढे ढकलल्याने एक हजार विद्यार्थी संतप्त झाले होते.
मोझे कॉलेजमध्ये झालेल्या परीक्षेतील गैरप्रकारानंतर विद्यापीठाने परीक्षा केंद्रावरील बंदीच्या केलेल्या कारवाईचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअरिंगच्या तृतीय व चतुर्थ वर्ष ईन-सेमच्या परीक्षा १९ ऑगस्ट पासून सुरु झाल्या आहेत. याचअनुषंगाने वाघोली येथील मोझे कॉलेजमध्ये तृतीय व चतुर्थ वर्ष ईन-सेम २०१९ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांची परीक्षेचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल
असे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कॉलेजला १८ ऑगस्ट रोजी कळविण्यात आले. परीक्षेच्या एकदिवस अगोदर विध्यापिठाने कॉलेजला कळविल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतर कॉलेजमध्ये परीक्षा सुरु असताना मोझे कॉलेजची परीक्षा पुढे ढकलल्याने १९ ऑगस्टला सकाळी विद्यार्थी जमा झाले. विद्यार्थ्यांनी आंदोलनचा पवित्रा घेतला. विद्यार्थी आक्रमक झाल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले.
विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत यामध्ये कॉलेजचा हात नाही. विद्यापीठाशी संपर्क साधून परीक्षेचे नियोजन पुढील दिवसात करण्यात येईल असे प्राचार्य सोमनाथ कोळगिरी यांनी सांगितले.
दिनांक १९ ऑगस्ट रोजी घेण्यात येणारी ईन-सेमच्या परीक्षा विद्यापीठ व कॉलेज प्रशासनाने एक दिवस आधीच अचानक पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, मानसिक तणाव व संभ्रम निर्माण झाला आहे. ईन-सेमच्या परीक्षाचे त्वरित नियोजित करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. परीक्षेचे वेळापत्रक स्थिर, पारदर्शक व ठोस पद्धतीने करावे. याबाबत विद्यापीठाने निश्चित धोरण आखावे अन्यथा पुणे जिल्हा (एसपी गट) राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. – करण थोरात (पुणे जिल्हा, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस)
