पुणे जिल्ह्यात ‘माहिती सेवा पत्रकार संघ’ची स्थापना पत्रकार भवन उभारण्याचा महत्त्वाचा ठराव
सुनील भंडारे पाटील
पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या न्याय व हक्कांसाठी, त्यांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी आणि व्यावसायिक बळकटीसाठी ‘माहिती सेवा पत्रकार संघ’ या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात कार्यरत असलेल्या सर्व पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्या, अडचणी आणि हक्कांबाबत संघटना सक्रीयपणे काम करणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
संघटनेच्या स्थापनेनंतर प्रथम झालेल्या बैठकीत पत्रकारांसाठी अत्यावश्यक असलेल्या सुसज्ज ‘पत्रकार भवन’ उभारण्याचा महत्त्वाचा ठराव सर्वसंमतीने करण्यात आला. पुणे शहराजवळ हे भवन उभारण्यात येणार असून पत्रकारांना येथे थांबण्याची सुविधा, प्रशिक्षण कार्यशाळा, संपादन व रिपोर्टिंगसाठी तांत्रिक साधने, वाचनालय, मिटिंग हॉल आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले. जिल्ह्यातील तरुण पत्रकारांना व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, पत्रकारांचे कौशल्य वाढावे आणि एकत्रित व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने पत्रकार भवनाची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.
याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे म्हणाले की, “ पत्रकारांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या हक्कांसाठी सामूहिक पातळीवर आवाज उठावा, या हेतूने माहिती सेवा पत्रकार संघाची स्थापना केली आहे. लवकरच सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू करणार असून या कार्यासाठी सर्वांनी सहकार्य आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.
या वेळी संघटनेे उपाध्यक्ष सचिन धुमाळ, सचिव प्रशांत भागवत, खजिनदार पोपट मांजरे, तसेच संचालक ज्ञानेश्वर पाटेकर उपस्थित होते,सर्वानी संस्थेच्या कामकाजात सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांचे कल्याण, कायदेशीर मदत, प्रशिक्षण उपक्रम आणि जिल्ह्यातील विविध भागांत संघटनेची भक्कम संरचना उभारण्यावर संघटना लक्ष केंद्रीत करणार असल्याचे संघटनेचे खजिनदार पोपट मांजरे यांनी सांगितले.
