शाश्वत शेतीसाठी केंदूरमध्ये कांदा लागवड प्रशिक्षणाचे आयोजन
केंदूर प्रतिनिधी
लोकसहभागातुन पाणलोट विकास या प्रकल्पा अंतर्गत केंदूर (तालुका शिरूर) मधील पाच गावांमधील शेतकऱ्यांसाठी कांदा लागवड आणि उत्पादन तंत्रज्ञानावर एक व्यापक कार्यशाळा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.
हा कार्यक्रम वाॅटर फाॅर पिपल इंडिया ट्रस्ट व 3M इंडिया लिमिटेड यांच्या आर्थिक सहकार्यातुन केंदुर परिसरातील शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पादकता आणि उपजीविका वाढविण्याच्या उद्देशाने राबविला जात आहे.
के.व्ही.के नारायणगाव येथील शास्त्रज्ञ डॉ. योगेश यादव यांच्या नेतृत्वाखाली, या सत्रात कांदा रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड तंत्रज्ञान, जैविक आणि रासायनिक खत व्यवस्थापन आणि प्रभावी कीटक आणि रोग नियंत्रण उपाय यासारख्या महत्त्वाच्या पैलूंवर महत्वपुर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी करण्यात आले.
संवादात्मक सत्रात शेतकऱ्यांनी उत्साही सहभाग घेत प्रश्न आणि अडचणी थेट डॉ. यादव यांना सांगण्याची संधी मिळाली व त्यावर योग्य ती माहिती शेतकऱ्यांना मिळाली.
वाॅटर फाॅर पिपल इंडिया ट्रस्ट पुणे , प्रकल्प समन्वयक तिलक कटरे, कृषी शास्त्रज्ञ यशवंत बहिरम आणि टीम सदस्यांनी तसेच ग्रामपंचायत केंदुर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाला केंदुर परिसरातील शेतकरी व शेती शाळा गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश कांदा लागवड व उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करून कांदा उत्पादन क्षमता वाढवुन शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रकल्पाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे कृषी विकासात आणि स्थानिक शेतकरी समुदायांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच हातभार लागेल.
