वाघोली पोलीस स्टेशनच्या वतीने बकोरी वनराईत भव्य वृक्षारोपण
सुनील भंडारे पाटील
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाघोली पोलीस स्टेशनच्या वतीने बकोरी वनराई (देवराई प्रकल्प) ता हवेली येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात वाघोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या उपस्थितीत शंभरहून अधिक देशी प्रजातींच्या झाडांची लागवड झाली.
सन २०१७ पासून वृक्ष मित्र चंद्रकांत वारघडे यांच्या माध्यमातून बकोरी-केसनंद डोंगरावर सातत्याने वृक्षलागवड चालू आहे. वेगवेगळ्या संस्थांना आवाहन करून वृक्षलागवडीला गती देण्यात आली असून, यावर्षी तब्बल एक लाख झाडांची लागवड पूर्ण झाल्याचे वारघडे यांनी सांगितले.
या उपक्रमात वाघोली पोलीस स्टेशनचे अधिकारी – पि.एस.आय. केदार, हवाले साहेब यांच्यासह महिला व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले होते. वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब, शेंदुर, करंज, सिसम अशा देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.
समाजातील पर्यावरणपूरक उपक्रमांना पोलीस प्रशासनाचे योगदान विशेष महत्त्वाचे असल्याचे या प्रसंगी जाणवले. वृक्षारोपणावेळी बकोरी देवराई वनराई प्रकल्प प्रमुख चंद्रकांत वारघडे, समितीचे हवेली तालुका अध्यक्ष कमलेश बहिरट, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जाधव, धणराज वारघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे बकोरी परिसरातील हरित पट्ट्याला नवी ओळख मिळणार असून पुढील पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचा संकल्प करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन का महत्त्वाचे?
1. वृक्षारोपणाचे फायदे – झाडांमुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साइड कमी होतो, ऑक्सिजन वाढतो, उष्णता नियंत्रणात राहते आणि पर्यावरणातील संतुलन टिकते.
2. जलसंधारणाची गरज – झाडांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरते, भूजलसाठे वाढतात आणि दुष्काळी परिस्थिती टाळता येते.
3. जैवविविधतेचे रक्षण – देशी झाडांच्या लागवडीमुळे पक्षी, प्राणी व कीटकांसाठी नैसर्गिक अधिवास तयार होतो.
4. मानवी आरोग्य व जीवनमान सुधारणा – स्वच्छ हवा, थंडावा व प्रदूषण नियंत्रणामुळे जीवनमान निरोगी राहते.
5. पुढील पिढ्यांसाठी वारसा – आज लावलेले झाड उद्या सावली, फळे, लाकूड व जीवनदायी हवा देणार आहे.
“झाडे लावा – झाडे जगवा” हा संदेश वाघोली पोलीस स्टेशनच्या वृक्षारोपण उपक्रमातून जनतेपर्यंत पोहोचला आहे.
