महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी आज गुरुवार (दि.१४ जुलै) रोजी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ही शिष्यवृत्ती परीक्षा बुधवार (दि.२० जुलै २०२२) रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
तथापी सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्सखलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २० जुलै २०२२ ऐवजी रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येईल. परीक्षेसाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१ जुलै २०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येतील. तरी उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची संबंधीत विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केले आहे.


