सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक सासवड(ता.पुरंदर ) शहराजवळील इनामके वस्ती येथे एका संकरित गायीमध्ये लम्पी त्वचारोगाचे लक्षणे आढळून आल्यानंतर, प्रशासनाने तातडीने पावले उचलली आणि बाधित क्षेत्रापासून पाच किलोमीटर अंतरावरील नऊ गावांत सुमारे ५ हजार ११८ जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.
पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक सासवड यांच्याकडून रोगप्रतिबंधक लस देण्यात येत आहेत. उर्वरित लसीकरण तालुका पशुधन विस्तार अधिकारी डॉ.शरद काटवटे, डॉ.विष्णू ठोंबरे (सासवड), डॉ.प्रशांत ऊटगे (वाल्हे), डॉ. परिहार (परींचे) यांचे मार्गदर्शनाखाली आठ कर्मचारी यांचे मदतीने ४८ तासांत करण्यात येत. आहे. पॉझिटिव्ह झालेल्या जनावरावर उपचार केल्यानंतर जनावराची प्रकृती व्यवस्थित झालेली आहे. पुरंदर तालुक्यात आज अखेर लम्पी रोगामुळे जनावरांची मरतूक झालेली नसल्याची माहिती गटविकास अधिकारी अमर माने तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी प्रशासनाचे वतीने दिली.
जिल्ह्यातून अथवा राज्यातून जनावरे खरेदी करण्यात येऊ नये, असे पशुसंवर्धन विभागाकडून आव्हान करण्यात येत आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता, लम्पीसदृश लक्षणे आढळून येताच, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करून, जनावरांचे उपचार करून घेणे गोठे स्वच्छ करून निर्जंतुक करणे व गोठ्यात कीटकनाशकांचा फवारा करावा, असे आवाहन पशुपालकांना करण्यात आले आहे.सर्व ग्रामपंचायती नगरपालिका व कृषी उत्पन्न बाजार समिती इत्यादी ठिकाणी जनजागृती करण्यात आलेली असून, विविध ठिकाणी फ्लेक्स लावून प्रबोधन करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी अमर माने, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. शरद काटवटे व तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली.

