पौड रोड (कोथरूड, पुणे) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे मानस सचिव संदीप कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की सध्या जगातील सर्वात युवक देश भारत आहे. राष्ट्रविकासासाठी ही जमेची बाजू आहे. युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कौशल्य विकास, उद्योजकता व सामाजिक विकास या बाबीवर भर देण्यात आला आहे.
युवकांच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती असून ती दिवसेंदिवस वाढत जाते त्यामुळे करिअर घडवण्यासाठी युवकांनी त्याचा वापर करणे आवश्यक असल्याचेही याप्रसंगी बोलताना मानद सचिव संदीप कदम यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी ध्वज उंचावून तसेच मानद सचिव संदीप कदम यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला. या कार्यक्रमास मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे, संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक सिताराम अभंग, परीक्षा विभागाचे देशपांडे सर, उपप्राचार्य शिवाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. क्रीडा शिक्षण संचालक डॉ. योगेश पवार, कल्चरल विभागाच्या डॉ. नीता कांबळे, अनिल दाहोत्रे तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे चोख नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश पवार यांनी केले.



