सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
बुधवार दि. ३१ ऑगस्ट रोजी लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून शनिवार दि. ३ सप्टेंबर रोजी लाडक्या गौरीं अर्थात लक्ष्मीचे सोन पावलांनी आगमन झाले. गौरींचे स्वागत समस्त महिलांनी मोठ्या उत्साहात केले.
दरम्यान आज रविवार ४ रोजी सर्वत्र गौरी पूजन असून निमित्त ठिकठिकाणी हळद कुंकवाचे कार्यक्रम तसेच अनेक ठिकाणी संगीत भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक, पारंपारिक, धार्मिक संदेश देणारे देखावे तयार केले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशाभिमान दाखविणारे वेगवेगळे देखावे, सामाजिक संदेश देणारे देखावे तसेच विविध फराळाचे पदार्थ करण्याची लगभग सुरु होती.
मंगल गौरींचे आगमन प्रसंगी महिलांनी हळदी कुंकवाचा वाण देत मोठ्या उत्साहात घरात आगमन झाले. परंपरेप्रमाणे प्रथम भाजी भाकरीचा नैवद्य देण्यात आला. त्यानंतर विविध विविध फळे, फुले, खाद्य पदार्थांची आरास तसेच लाईटच्या माळांची सजावट करण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक महिलांनी विविध देखावे सादर केले आहेत. सोमवार दि. ५ रोजी गौरी विसर्जन करण्यात येणार आहे.
वनपुरी येथे गौरींची स्थापना करण्यात आली,गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु ग्रामीण भागात गौरीपूजन क्वचित साजरे केले जाते. पुरंदरच्या वनपुरी गावातील देवाचे पुजारी असलेले रूढ कुटुंबात पिढ्यानपिढ्या गौरीस्थापना केली जाते. थोरले दामोदर रूढ तर लहान जगन्नाथ रूढ बंधू दोघेही सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव बरोबर गौरींची स्थापनाही केली जाते. विशेष म्हणजे संपूर्ण गावात एकमेव कुटुंब गौरी स्थापना करीत आले आहे. दामोदर रूढ यांच्या पत्नी विमल रूढ आणि सुनबाई वनश्री रूढ व ऋतुजा रूढ तसेच जगन्नाथ रूढ यांच्या पत्नी सुमन रूढ आणि त्यांच्या सुनबाई प्रिया रूढ यांनी यावर्षीही गौरीच्या मुखवट्यांची स्थापना केली आहे. सत्यनारायण महापूजा, संगीत भजन आदि कार्यक्रम केले जातात.

