March 30, 2026
शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
           पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री व  विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने शनिवार (दि. २३ जुलै) रोजी शनिवारवाडा ते हडपसर पर्यंत विविध सामाजिक संदेश देणारी सायकल रॅली काढली जाणार आहे,

 तसेच पुणे ते बारामती पर्यंत राष्ट्रीय पातळीवरील सायकल स्पर्धा होणार आहे. सायकल स्पर्धा व रॅलीत स्पर्धकांनी व सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ऍड.संदीप कदम यांनी केले आहे.  

 सायकल रॅलीत लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कलाकार, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणवादी असे सुमारे ३ हजार सायकलप्रेमी सहभागी होणार आहेत. सायकल रॅलीत बेटी पढाव बेटी बचाव, प्लास्टिक बंदी, वृक्षसंवर्धन, पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्ती, वाहतूक नियंत्रण तसेच स्वच्छता अभियानाबाबत सामाजिक संदेश दिला जाणार आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेत महाराष्ट्रासह तेरा राज्यातील सुमारे पाचशेहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. रॅली आणि स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीणाऱ्यानी डॉ. योगेश पवार (मोबाईल ९८५०९५२७८७), संस्था कार्यालय ( ०२०-२५४३४५७०) येथे संपर्क साधण्याचे तसेच गुगल लिंक वरुन फॉर्म भरण्याचे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ऍड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार व सहसचिव ए.एम.जाधव आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दरम्यान पौड रोड येथील मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात सायकल रॅली संदर्भात नियोजन सभेत बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे यांनी जास्तीत-जास्त  विद्यार्थ्यांनी सायकल रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.