March 30, 2026
रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
     रांजणगाव (ता शिरूर) औद्योगिक वसाहतीच्या   परिसरात निराधार मनोरुग्ण अवस्थेत फिरणाऱ्या महिलेस अखेर रांजणगाव एमआयडीसी पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हक्काचा निवारा मिळाला आहे.    

 याबाबत सविस्तर असे की,रांजणगाव एमआयडीसी येथील फियाट कंपनी येथील गेट नंबर १ येथे एक महिला गेल्या काही दिवसांपासून निराधार व बेवारस स्थितीत आढळून आली होती.अचानक वाढलेली थंडी तसेच सदरील महिला काही दिवसांपासून उपाशी असल्याचे ही कामगारांना दिसून आले.यावेळी सदरील बाब ही रोहित चौधरी यांनी शिरूर येथील सामाजिक कार्यकर्त्या व आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशनच्या संस्थापिका राणी चोरे यांना सांगितली.यावेळी चोरे यांनी देखील तत्काळ सदर ठिकाणी धाव घेत मनोरुग्ण महिलेची अवस्था पाहिली.त्यांनी ही बाब रांजणगाव पोलिसांना सांगितल्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,सामाजिक कार्यकर्त्या मीना गवारे यांच्यासह सदर महिलेस पोलिस स्टेशन येथे हजर करत रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणी व उपचार केल्यानंतर   आव्हाळवाडी येथील माहेर संस्थेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत संस्थेत दाखल केले.   

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या राणी चोरे यांनी सांगितले की,महिलेची अवस्था पाहिली असता पुढील होणारी गैरसोय टाळण्यासाठी महिलेला योग्य ठिकाणी दाखल करणे गरजेचे होते.कंपनीतील रोहित चौधरी सारख्या तरुण व्यक्तींनी समाजात माणुसकी दाखवून दिल्यामुळे आज तिला सुरक्षित ठिकाणी पोहोचवता आले.यावेळी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी कुटे,पोलिस हवालदार वैभव मोरे,पोलिस कॉन्स्टेबल शुभम मुत्याल,रोहिणी हजारे,मीना गवारे,गणेश जामदार आदींचे मोठे सहकार्य लाभले.पोलिसांच्या सहकार्यामुळे निराधार मनोरुग्ण महिलेस हक्काचा निवारा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.