शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
ग्लोबल टीचर डिसले गुरुजींवर अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसले गुरुजीं व भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे तसेच शिष्टमंडळाला दिले.
सह्याद्री अतिथीगृहावर डिसले गुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, आमदार सुभाष देशमुख, प्रविण दरेकर व गिरीश महाजन आदी उपस्थित होते.
डिसले गुरुजी यांनी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून शिक्षणात आगळेवेगळे प्रयोग करत जगात महाराष्ट्राचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे असतानाही कांही अधिकाऱ्यांकडून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी बदनामी होत असल्याचे यावेळी बोलताना अनिल बोरनारे यांनी सांगितले.


