सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
अलीकडच्या काळात रस्त्यावरील अपघात मोठ्या प्रमाणात वाढले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. केवळ अपघातामुळे दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत असून शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी होवून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अपघात रोखण्यासाठी शासकीय पातळी वरून अनेक प्रयत्न होत असले तरी चालकांचा निष्काळजीपणा तेवढाच जबाबदार आहे. केवळ नियम करून चालणार नाही तर, नियमांचे पालन होणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यामुळे चालकाने दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करून पुढे जाण्याची स्पर्धा न करता आपल्या कुटुंबियांचा आणि वाहनातील इतर प्रवाशांच्या जीवाचाही विचार करून सुरक्षित प्रवास करावा. असे आवाहन सासवडचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे चालक दिनानिमित्त पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते वहान चालकांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, गोपनीय विभागाचे रुपेश भगत, वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार संतोष शिंदे, योगेश गरुड, होमगार्ड विभागाचे पलटण नायक विजय ताम्हाणे, जवान विक्रम जगताप, चक्रधर गोपाळघरे, श्रीकांत भंडलकर, सचिन पवार, नितीन लोखंडे, राहुल भुजबळ आदी उपस्थित होते.

