March 30, 2026
प्रतिनिधी सचिन सुंबे 
           पुणे प्रहार चे संपादक प्रतीक गंगणे यांना सूर्यदत्त सूर्यभारत पत्रकारिता पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी मराठी पत्रकार दिन, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पत्रकारिता सप्ताहाचा समारोप, ‘सर्वांगीण शिक्षण व पत्रकारिता’ या विषयावर परिसंवाद आणि ‘सूर्यदत्त सूर्यभारत पत्रकारिता सन्मान २०२४ʼ सोहळ्यात पुण्यातील विविध दैनिकाच्या संपादकांनी आपले विचार मांडले.

         शिक्षण आणि पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेतच; शिवाय ते दोन्ही समाज घडविण्याचे काम करतात. औपचारिक शिक्षणातून विद्यार्थी घडत जातो. अनौपचारिक शिक्षणातून माणूस व समाज घडतो. त्यामुळे सर्वांगीण शिक्षणावर भर द्यायला हवा. प्रत्येकाने आपली मूल्ये जपत कर्तव्य भावनेतून कार्य करायला हवे,” असा सूर परिसंवादात उमटला.

          पत्रकार भवन येथे झालेल्या सोहळ्यात लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाईम्सचे निवासी संपादक श्रीधर लोणी, भास्करचे समूह संपादक प्रकाश दुबे, आज का आनंदचे संपादक आनंद अग्रवाल, सामनाचे सहसंपादक अरुण निगवेकर, प्रभातचे संपादक अविनाश भट, पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे, राष्ट्रसंचारचे संपादक अनिरुद्ध बडवे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया, संचालक प्रशांत पितालिया, सल्लागार मंडळ सदस्य जीवराज चोले आदी उपस्थित होते.

         मनोज रानडे (सामना), शैलेश काळे (आज का आनंद), लक्ष्मण मोरे (पुणे टाइम्स मिरर), राजू हिंगे (लोकमत), मीनाक्षी गुरव (सकाळ), हर्ष दुधे (महाराष्ट्र टाइम्स), विजय चव्हाण (केसरी), गणेश खळदकर (पुढारी), निलेश चौधरी, (पुण्यनगरी), सलोनी मिस्त्री (टाइम्स ऑफ इंडिया), शिवराज सणस (आकाशवाणी), योगेश बोरसे (टीव्ही ९ मराठी), अमोल धर्माधिकारी (लोकशाही न्यूज), सचिन जाधव (साम टीव्ही), सागर आव्हाड (झी २४ तास), मंगेश फल्ले (दिव्यमराठी), व्यंकटेश भोळा (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), यशवंत सिंह (नवभारत), प्रतीक्षा पारखी (एनडीटीव्ही), सोनाली भालेसईन (पोलिसनामा), प्राजक्ता जोशी (इंडी जर्नल), सारिका रोजेकर (राष्ट्रसंचार), अभिजित दराडे (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन), ज्ञानेश्वर चौतमल (पुढारी न्यूज), प्रतीक गंगणे (पुणे प्रहार) यांना ‘सूर्यदत्त सूर्यभारत पत्रकारिता सन्मान २०२४ʼ देऊन गौरविण्यात आले.

           संजय आवटे म्हणाले, “शिक्षण आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांचे सार्वत्रीकरण झाले आहे. सद्यस्थिती लक्षात घेता माध्यमांनी आणि पत्रकारांनी दक्ष राहून काम केले पाहिजे. समाजाभिमुख पत्रकारितेची आज गरज भासते आहे. आभासी जगात, फेक न्यूजच्या जमान्यात आपण काम करतो आहोत. अशावेळी अधिक सजगपणे नीतिमूल्यांशी तडजोड न करता निर्भीडपणे आपण भूमिका मांडत राहिले पाहिजे. समाजाला दिशा देणाऱ्या, युवा पिढीला सर्वांगीण पद्धतीने घडवणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन द्यायला हवे.

           प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पत्रकार हा लोकशाहीचा एक खांब असल्याचे आपण मानतो. चांगल्याला प्रोत्साहन आणि वाईटावर प्रहार करणारी पत्रकारिता समाजाच्या हिताची ठरते. सूर्यदत्त संस्थेच्या गेल्या २५ वर्षांच्या प्रवासात माध्यमांनी दिलेले प्रोत्साहन मोलाचे राहिले आहे. सर्वांगीण विकासाचे व वैश्विक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्तमध्ये पत्रकारिता सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यातून विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या गोष्टी शिकता येतात. आंतरशाखीय शिक्षणावर आम्ही भर देत आहोत. या प्रवासात आपल्या सर्वांचे सदैव सहकार्य असते. वृत्तपत्र वाचन हा तरुणांच्या, नागरिकांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग व्हायला हवा. तसेच कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी माध्यमांचे महत्व, त्यांची ओळख करून घ्यायला हवी.”प्रशांत पितालिया यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.