पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार उतरविला नसला तरी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे. तसेच महायुतीच्या उमेदवारांचा त्यांच्याकडून जोरदार प्रचार देखील सुरू आहे.पण आता एक नवी मागणी करत मनसे पक्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी काँग्रेसच्या चिन्हाची म्हणजेच हाताची पंजाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांच्या या तक्रारीमुळे काँग्रेस विरुद्ध मनसे असा नवा वाद निर्माण होण्याची आता शक्यता आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे तक्रार करत काँग्रेस पक्षाचे पंजा हे चिन्ह बदला किंवा पोलीस दलाच्या बोध चिन्हांमध्ये असलेला पंजा काढून टाका अशी मागणी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या संदर्भातील निर्णय लगेच न झाल्यास त्यांनी या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे.
त्यामुळे निवडणूक आयोग या प्रकरणात नेमका काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागलेले आहे. हाताचा पंजा या चिन्हामुळे आदर्श आचार संहितेचा भंग होत असल्याची तक्रार मनसे नेते अशोक तावरे यांच्याकडून करण्यात आली आहे.मनसे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मागणीनुसार, काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह हे पंजा असून पोलीस दलाच्या बोध चिन्हामध्ये देखील हाताचा पंजा चिन्हाचा वापर करण्यात आला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशावर देखील पंजा चिन्ह आहे. महत्त्वाची बाब म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक पोलीस कर्मचारी काम करत असतात, त्यामुळे त्यांच्या गणवेशावर असलेल्या हाताच्या पंजा मुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होतो, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचे चिन्ह बदलावे किंवा पोलीस दलाच्या बोध चिन्हातील हाताचा पंजा काढून टाकावा अशी मागणी मनसे नेत्याकडून करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
