संघर्षातून घडलेले कर्तृत्व; राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित डॉ. सुषमा उद्धवराव तायडे यांना उत्कृष्ट क्रीडा संचालक पुरस्कार
सुनील भंडारे पाटील
जिद्द, संघर्ष आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर क्रीडा क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या श्री रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालिका तथा राष्ट्रीय खेळाडू डॉ. सुषमा उद्धवराव तायडे यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीकडून “उत्कृष्ट शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक” हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कार रुजविणे, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविणे, विविध स्पर्धांचे यशस्वी आयोजन, महिला हॉकी क्षेत्रातील योगदान, खेलो इंडिया उपक्रमातील सहभाग तसेच विविध निवड समित्यांवरील प्रभावी कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
डॉ. सुषमा तायडे यांचा प्रवास संघर्षातून घडलेल्या कर्तृत्वाचा आदर्श मानला जातो. ग्रामीण भागातील सामाजिक बंधने आणि विरोध पत्करून वडील उद्धवराव तायडे यांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी पाठविले.
त्या विश्वासाला सार्थ ठरवत त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करत क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात भरीव यश मिळविले. बी.पी.ई., एम.पी.एड., बी.पी.एड., पीएच.डी. तसेच एन.आय.एस. (National Institute of Sports) चे विशेष प्रशिक्षण पूर्ण करत त्यांनी शारीरिक शिक्षण आणि प्रशिक्षक म्हणून आपली शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता अधिक सक्षम केली.
डॉ. सुषमा तायडे यांच्या कारकिर्दीतील विशेष मानाचा टप्पा म्हणजे भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते १९ डिसेंबर १९९७ रोजी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आलेला राष्ट्रपती रेंजर अवॉर्ड होय.
हा सन्मान त्यांच्या कर्तृत्वाला राष्ट्रीय पातळीवरील मान्यता देणारा ठरला.यापूर्वीही विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. महिलांसाठी प्रेरणा, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि क्रीडा क्षेत्रासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
पुरस्कार वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. सुदाम शेळके (संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), प्रो. डॉ. रमेश गायकवाड (अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), श्री. वीरसिंह रानसिंग (सचिव, इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान), महेश बापू ढमढेरे (संचालक, शिक्षण प्रसारक मंडळ), डॉ. अमेय काळे (सचिव, पुणे जिल्हा क्रीडा समिती), डॉ. गणेश चव्हाण व डॉ. शीतल शेंडगे (सहसचिव, पुणे जिल्हा क्रीडा समिती) तसेच प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सुषमा तायडे यांचा गौरव करण्यात आला.
या पुरस्कारामुळे शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. श्री रामचंद्र एज्युकेशन ट्रस्टचे सर्व सदस्य,श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. सुषमा तायडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
![]()
